कमी बॉल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात ईडी सरकार लवकरच ‘रनआऊट’ होईल – महेश तपासे

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या मेट्रो ३ च्या चाचणीला आज हिरवा झेंडा दाखवला. दरम्यान, या कार्यक्रमा दरम्यान, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी “विघ्नहर्त्याने या राज्यावरील बरीचशी विघ्नं आता दूर केली आहेत. त्यामुळे आता विघ्नं येतील असं मला वाटत नाही,” असे म्हणत त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्यावर टीका केली आहे. तसेच मेट्रो ३ च्या कामाला शुभेच्छा दिल्या. कुलाबा-वांद्रे-सिप्स मेट्रो लाइन-३ च्या प्रोटोटाईप ट्रेन चाचणी शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी कमी बॉल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात ईडी सरकार लवकरच ‘रनआऊट’ होईल असं म्हणत टोला लगावला आहे. राजकीय लालसेपोटी ईडी सरकारकडून चुकीचे धोरण तर स्वीकारले जात नाही ना, अशी शंका महाराष्ट्रातील जनतेच्या मनात निर्माण होऊ लागल्याचे तपासे म्हणाले.
एकीकडे न्यायालयीन खटला, दुसरीकडे नैराश्यग्रस्त बंडखोर आमदार आणि तिसरीकडे ठाकरे गटाला मिळणारा जनप्रतिसाद आणि त्यावर ‘सी वोटर’ चा लोकसभा निवडणुकीबाबत आलेला सर्व्हे या सर्व बाबींमुळे ईडी सरकार वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
दरम्यान, एकनाथ शिंदेंनी फडणवीस सरकारच्या काळाचा उल्लेख करत कौतुक केले. ते म्हणाले, “युतीचं सरकार येऊन आज दोन महिने झाले आहेत. ३० तारखेलाच शपथविधी झाला होता. आम्हाला या बहुचर्चित मेट्रो चाचणीसाठी हिरवा झेंडा दाखवण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल मी मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे आभार मानतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, या कामावरील स्थगिती उठवली पाहिजे आणि दीर्घकाळ प्रलंबित हा प्रकल्प पुढे नेण्याचा आम्ही निर्णय घेतला.”





