Ashok Kharat : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) स्वयंघोषित बाबा अशोक खरातविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला असून, लवकरच त्याची चौकशी केली जाणार आहे. या केंद्रीय तपास संस्थेच्या मुंबई विभागीय कार्यालयाने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवाल दाखल केला आहे. (Ashok Kharat) खरातविरोधात महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेल्या अनेक एफआयआरची ईडीने दखल घेतली आहे. त्याच्या विरोधात एकूण आठ एफआयआर दाखल केले आहेत. खरात आणि त्याच्याशी संबंधित इतर काही व्यक्तींची ईडीकडून लवकरच चौकशी केली जाईल. खरातला बलात्कारप्रकरणी मार्च महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात लैंगिक अत्याचार, जमिनीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार, काही सहकारी पतसंस्थांमध्ये खाती उघडणे आणि इतर मालमत्तांशी संबंधित अशा अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. तसेच, खरातची सर्व बँक खाती आमच्या निदर्शनास आली असून, त्या खात्यांमार्फत करण्यात आलेले व्यवहारही आम्ही ओळखले आहेत. त्याची सर्व बेकायदेशीर मालमत्ता आणि केलेले गैरकृत्य नक्कीच उघडकीस येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. (Ashok Kharat)