PFI: कट्टरपंथी ‘पीएफआ’वर ईडीची मोठी कारवाई, 56 कोटींच्या 35 मालमत्ता जप्त

नवी दिल्ली – अंमलबजावणी संचालनालयाने प्रतिबंधित कट्टरपंथी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या 56.56 कोटी रुपयांच्या 35 स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमत्ता त्यांच्या विविध ट्रस्ट, फर्म आणि व्यक्तींच्या नावावर आहेत. केंद्रीय तपास संस्थेने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, 35.43 कोटी रुपयांच्या 19 स्थावर मालमत्ता आणि 21.13 कोटी रुपयांच्या 16 स्थावर मालमत्ता (56.56 कोटी रुपयांच्या एकूण 35 स्थावर मालमत्ता) जप्त करण्यात आल्या.
ईडीने आपल्या निवेदनात आरोप केला आहे की, पीएफआयचे अधिकारी, सदस्य भारतात दहशतवादी कृत्ये करण्यासाठी निधी जमा करण्यासाठी बँकिंग चॅनेल, हवाला, देणग्या इत्यादींद्वारे भारत आणि विदेशातून निधी जमा करण्याचा प्रयत्न करत होते, असे तपासात आढळले आहे.
ईडीच्या म्हणण्यानुसार, पीएफआयने भारतात आणि परदेशात बेकायदेशीर मार्गाने गोळा केलेला निधी केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, जम्मूसह देशभरातील 29 बॅंक खात्यामध्ये जमा केला आहे.
ईडी ने दावा केला की पीएफआयने बेकायदेशीर मार्गाने आणि बनावट देणगीदारांच्या माध्यमातून रोख स्वरूपात किंवा बँक खात्यांद्वारे जमा केलेले पैसे गुन्ह्यासाठी वापरला जात आहे, एकूण रक्कम 94 कोटी रुपये आहे. आतापर्यंत, पीएफआच्या 26 सदस्य आणि कार्यकर्त्यांना ईडीने अटक केली आहे आणि फेब्रुवारी 2021 ते मे 2024 या कालावधीत 9 फिर्यादी तक्रारी दाखल केल्या आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाने आपल्या तपासात म्हटले आहे की, पीएफआयचे सिंगापूर आणि कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि सौदी अरेबिया या आखाती देशांमध्ये 13,000 हून अधिक सक्रिय सदस्य आहेत. पीएफआयने आखाती देशांमध्ये राहणाऱ्या मुस्लिम प्रवासींसाठी जिल्हा कार्यकारी समित्या (डीईसी) तयार केल्या आहेत, ज्यांना निधी संकलनाचे काम देण्यात आले होते.





