Economics Nobel 2026 : अर्थशास्त्राचा नोबेल जाहीर; ‘या’ संशोधनामुळे रॉबर्ट हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांचा सन्मान
Economics Nobel 2026 : इकोनॉमिक्सचा नोबेल पुरस्कार 2026 रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांना जाहीर झाला. आर्थिक संकट आणि बाजारातील चढ-उतारांवर त्यांच्या संशोधनाचा कसा उपयोग होतो, जाणून घ्या.

Economics Nobel 2026 : अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आला असून अमेरिकेतील अर्थशास्त्रज्ञ रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. आर्थिक संकट आणि बाजारातील चढ-उतार समजून घेण्यासाठी तसेच त्यांचा परिणाम कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणारे आर्थिक मॉडेल विकसित केल्याबद्दल त्यांची निवड करण्यात आली आहे.
स्वीडनच्या रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसने स्टॉकहोम येथे पुरस्काराची घोषणा केली. दोन्ही अर्थशास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे सरकार आणि केंद्रीय बँकांना अर्थव्यवस्थेतील अचानक होणारे बदल समजून घेण्यासाठी मदत होते. आर्थिक तेजी-मंदीच्या काळात स्थिरता राखण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होतो.
रॉबर्ट हॉल हे कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठाशी, तर मायकेल वुडफोर्ड हे न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठाशी संबंधित आहेत. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर वुडफोर्ड यांनी हा मोठा सन्मान असल्याचे सांगितले.
आर्थिक विज्ञान पुरस्कार समितीचे अध्यक्ष जॉन हासलर यांनी सांगितले की, दोन्ही अर्थशास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे आर्थिक बदलांचा परिणाम समजून घेण्यासाठी मजबूत सैद्धांतिक आधार तयार झाला. ऊर्जा संकट किंवा नागरिकांच्या खर्च करण्याच्या पद्धतीत अचानक झालेला बदल यामुळे अर्थव्यवस्थेवर दबाव येऊ शकतो. अशा परिस्थितीत सरकार आणि केंद्रीय बँकांना योग्य निर्णय घेण्यासाठी या आर्थिक मॉडेलचा उपयोग होतो.
दरम्यान, २०२६ च्या अर्थशास्त्र नोबेल पुरस्काराची रक्कम १.२ कोटी स्वीडिश क्रोनर, म्हणजे सध्याच्या विनिमय दरानुसार भारतीय रुपयात सुमारे ₹११.६ कोटी आहे. ही रक्कम दोन्ही विजेत्यांना मिळून दिली जाणार आहे. पुरस्काराचे अधिकृत वितरण १० डिसेंबर २०२६ रोजी स्टॉकहोम, स्वीडन येथील कॉन्सर्ट हॉलमध्ये होणार आहे.





