विद्यार्थ्यांनी घडविल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती!

“ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल’ मध्ये “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ कार्यशाळा
पुणे – मातीपासून स्वत:च्या हाताने मूर्ती तयार करण्याचा आनंद दिवसेंदिवस हरवत चालला आहे. त्यामुळे “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ ही विद्यार्थ्यांसाठी चांगली संधी आहे, अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली. तर आम्हाला या उपक्रमाच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने “गणराया’ची मूर्ती साकारता आली, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.
निमित्त होते, “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ या कार्यशाळेचे! या उपक्रमाच्या चौथ्या दिवशी सिंहगड रस्त्यावरील “ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल’ येथे कार्यशाळा पार पडली. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी दै. “प्रभात’ने “माणिकचंद’ प्रस्तुत “प्रभात ग्रीन गणेशा 2019′ ही शाडूच्या मूर्ती बनवण्याची कार्यशाळा दि. 30 ऑगस्टपर्यंत घेण्याचे ठरवले आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील दहापेक्षा अधिक शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येणार असून, या आगळ्या-वेगळ्या उपक्रमासाठी सहप्रायोजक म्हणून बांधकाम व्यवसायातील अग्रणी सिद्धीविनायक ग्रुप, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील पास्को एन्व्हायर्मेंटल सोल्युशन्स आणि महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लि., श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि पुणे महापालिका यांचे सहकार्य लाभले आहे.
“ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल’मध्ये विद्यार्थ्यांनी कलात्मकतेने पर्यावरणपूरक गणपती साकारले. “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मातीतून गणेशमूर्ती साकारण्याचा आनंद घेतला. या शाळेतील सुमारे 100 विद्यार्थ्यांनी मूर्ती साकारली. यासह पर्यावरणपूरक “बाप्पा’ला साजेशी सजावट करणार असल्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला आहे.
यावेळी शिल्पकार नितीन ठाकरे आणि दै. “प्रभात’चे वरिष्ठ बातमीदार समीर कोडीलकर यांच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापिका रेणुका दत्ता यांना मानपत्र देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना सहज आणि सोप्या पद्धतीने शाडू मातीपासून गणेशाची मूर्ती कशी साकारायची, याचे प्रशिक्षण देण्यात आले. नितीन ठाकरे आणि त्यांचे सहकारी विद्यार्थ्यांना हे तंत्र शिकवत आहेत.
बाप्पाची सजावट पर्यावरणपूरक करणार
आम्ही पहिल्यांदाच मूर्ती तयार केली. याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा यावर्षी करणार आहोत. मूर्तीच्या बरोबरीने यंदाची घरची सजावट पर्यावरणपूरक करण्यावर भर देणार आहे. अतिशय कमी वेळात ही मूर्ती बनवली तसेच मूर्ती तयार करताना अनेकदा जमले नाही. मात्र, प्रशिक्षकांच्या सहकार्याने आम्ही प्रयत्न केले आणि मूर्ती साकारली, याचा विशेष आनंद आणि अभिमान आहे, असे विद्यार्थी दै. “प्रभात’शी बोलताना म्हणाले.
सद्यपरिस्थितीत प्रदूषणाचा विळखा शहराभोवती वाढत असल्याने पर्यावरणाचे संवर्धन करणाऱ्या उपक्रमांची नितांत गरज आहे. त्याची सुरुवात शाळांपासून होते. त्यामुळेच पर्यावरणपूरक विविध उपक्रम शाळेमध्ये राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे. याबद्दल दै. “प्रभात’चे धन्यवाद. या मूर्ती साकारताना त्यांची कौशल्येही विकसित होतात. स्वत: बनवलेल्या या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना ही मुले करणार आहे. केवळ विद्यार्थी नव्हे तर सर्वच नागरिकांनी पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतल्यास नक्कीच सध्याच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते.
– रेणुका दत्ता, मुख्याध्यापिका, ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल






