नगर -नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून माजी महसूलमंत्री आमदार बाळसाहेब थोरात यांनी कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असे साकडे नगर शहरातील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने घातले आहे. येत्या 2 जूनला मुंबईत प्रदेश कॉंग्रेसतर्फे राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमिवर कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आज आ. थोरात यांची भेट घेऊन त्यांना दक्षिणेतून लोकसभा लढविण्याचा आग्रह धरला. यावेळी ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक शहर कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, ओबीसी शहर कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, युवक कॉंग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते, उपाध्यक्ष अलतमश जरीवाला, मनसुख संचेती, रतिलाल भंडारी, विलास उबाळे, रोहिदास भालेराव, युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष आकाश अल्हाट, कॉंग्रेस सामाजिक न्याय युवा विभाग शहर जिल्हाध्यक्ष प्रणव मकासरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
काळे म्हणाले की, आ. थोरात हे राज्यातील विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत. राज्याच्या राजकारणात सुसंस्कृत आणि विकासात्मक व्हिजन असणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. तुकाराम गडाख वगळता राष्ट्रवादीला या मतदारसंघात सातत्याने अपयश आले आहे. विधानसभेच्या दक्षिणेतील सर्व जागा राष्ट्रवादी लढते आहे. दक्षिणेतील कॉंग्रेस कार्यकर्त्यांना न्याय मिळायचा असेल तर दक्षिणेची लोकसभेची जागा कॉंग्रेसने लढवली पाहिजे. त्यामुळे मुंबईच्या बैठकीत दक्षिणेच्या जागेवर कॉंग्रेस दावा करणार असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.