पूर्व हवेलीतील प्रश्न सुटणार: पीएमआरडीए आयुक्त सकारात्मक, भाजप नेत्यांशी चर्चेनंतर संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना

वाघोली – यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या जमिनीवरील आरक्षण रद्द करणे, नगर रोड व सोलापूर रोड हॉटेल व्यवसायिकांच्या प्रश्नसंदर्भात आणि वाघोली येथील नागरिकांच्या महत्त्वाच्या प्रश्नासंदर्भात पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांची भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.
हवेली येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची जमीन गट नं. १, २ व ४१ वर पीएमआरडी पुणे यांनी दि.२/८/२१ रोजी विकास आराखड्यामध्ये बस डेपो, शॉपिंग सेंटर, पार्किंग, टुरिस्ट सेन्टर, कल्चर सेन्टर, टाऊन पार्क या स्वरुपातील पीएमआरडी ने टाकलेले आरक्षण रद्द करणे, पुणे नगर व सोलापूर रोड येथील हॉटेल व्यवसायिकांना वाढीव बांधकामा संदर्भात ज्या नोटिसा आल्या होत्या या नोटीस रद्द करून या हॉटेल व्यवसायिकांना बांधकाम नियमित करण्यासाठी वेळ मिळण्यासंदर्भात, वाघोली पाणी पुरवठा योजना मंजूर असून ५ वर्षांत पूर्ण झाली नाही, या योजनेचे काम पूर्ण व्हावे.
तसेच राहू रोड ते तांबेवाडी सिमेंट काँक्रिट रस्ता, वाघोली येथील बायफ रोड ते वडजाई सिमेंट काँक्रिट रस्ता करण्याबाबत, रस्ते, वाघोलीतील गटार लाईन, अंतर्गत रस्ते सुधारणा करणे वरील सर्व प्रश्नांसंदर्भात पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी सोडवण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.
यावेळी माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, यशवंत सहकारी साखर कारखाना चेअरमन सुभाष जगताप, व्हॉइस चेअरमन मोरेश्वर काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, संजय सातव, संचालक राहुल घुले, किशोर उंद्रे, मिलिंद काळभोर, पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष संदीप सातव, सचिन मचाले, मनोज जाधवराव उपस्थित होते.





