कोयनेला साकारतेय भूकंपग्रस्तांचे स्मृती स्मारक, पालकमंत्री शंभूराज देसाईंकडून दहा लाखांचा निधी

– विजय लाड
कोयनानगर – कोयना भागासह पाटण तालुक्याचा इतिहास व भूगोल ज्या विनाशकारी भूकंपाने बदलला, तो 11 डिसेंबर 1967 हा दिवस. कोयना खोऱ्यातील नागरिकांसाठी काळरात्र बनणारा हा दिवस. त्याला आज 56 वर्ष पूर्ण होत आहेत. साडेपाच दशकांपासून कोयना भूकंपग्रस्थ युवकांची परवड थांबली नसली, तरी साडेपाच दशकानंतर पहिल्यांदाच कोयनेत होणारे भूकंपग्रस्तांचे स्मृती स्मारक ही गोष्ट महत्वाची असून यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दहा लाखांचा निधी दिला आहे.
भूकंप व भूकंपग्रस्त दाखले उशाला घेवून झोपणाऱ्या कोयना भूकंपग्रस्त युवकांना रोजगाराच्या संधी मोठया प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. पाटण तालुक्यात विकासकामांसाठी भरघोस निधी येत असून धोरणात्मक निर्णय होत आहेत. पण, भूकंपग्रस्तांसाठी ठोस असा निर्णय व विधायक काम झालेले नाही. शिक्षण, आरोग्य, रोजगार या समस्या नेहमीच कोयनावासियांना भेडसावत आहेतच.
11 डिसेंबर 1067 रोजी पहाटे 7.5 रिश्टर स्केल भूकंपाचा शक्तिशाली धक्का या परीसरात बसला अन् काही कळायच्या आतचं होत्याचं नव्हतं झालं. या धक्क्याने त्यावेळी 175 निष्पाप लोकांचे जीव गेले. यामुळे कोयना योजना शापीत झाली होती. या शक्तिशाली भूकंपाचा धक्का उत्तरेला सुरत, उज्जैनपर्यंत, दक्षिणेला बंगरुळपर्यंत, तर पूर्वेला नागपूर, हैदराबादपर्यंत जाणवला होता.
या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना खोऱ्यात असल्याने येथे सुलतानी संकट कोसळून अनेक प्रश्न निर्माण झाले होते. राज्याचे लक्ष कोयना धरणाकडे होते. कोयना धरण ही केवळ दगड-माती, विटाची निर्जीव वास्तू नसून मराठी माणसे, कामगार, अभियंत्यांनी मराठी मातीतील जिद्द, इर्षा, चिवटपणा कोयना धरणाच्या माध्यमातून उभी केल्याने ते अभेद्य राहिले.
या प्रलयंकारी भूकंपाने कोयना भागातील 60 गावातील 40 हजार 499 घरे जवळपास 80 टक्के क्षतिग्रस्त झाली होती. तसेच पायाभूत सुविधाही नष्ट झाल्या. भूकंपाच्या धक्क्यातून सावरायला तत्कालीन यंत्रणा व सुविधा पाहता कोयना भाग हा पुन्हा उभा राहू शकतो का? असा समज बऱ्याच प्रमाणात झाला होता.
परंतु, पाटण तालुक्याचे व कोयना भागाचे सुदैवच म्हणून त्याकाळी तालुक्याचे लोकप्रतिनिधी ना. बाळासाहेब देसाई होते. या काळात त्यांनी दिवसरात्र परिश्रम करून भूकंपामुळे विस्कटलेली कोयना भागाची घडी बसवून तो विषय त्यांनी हातावेगळा केला. बाळासाहेब देसाई यांनी घेतलेल्या परिश्रमाचे हुंकार हा महाराष्ट्र जाणतो.
त्या प्रलयाच्या कटू आठवणींनी सर्वांचा थरकाप उडतो. गत 56 वर्षात या भूकंपाच्या भेगा बुजल्या असल्या, तरी जखमा मात्र अजूनही भळभळत आहेत. भूकंपप्रवण क्षेत्राच्या शिक्क्यामुळे येथे नवीन उद्योग, प्रकल्प उभे राहत नाहीत. परिणामी, येथील युवक पोटाची खळगी भरण्यासाठी शहराचा रस्ता धरत आहेत. 1995 साली बंद केलेले भूकंपाचे दाखले पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी 2015 साली सुरू केले.
त्याचा अनेक तरुणांना लाभ होत आहे. कोयना भूकंप पुनर्वसन समितीसाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा निधी येतो. परंतु, त्या माध्यमातून मात्र उठावदार काम कोयना खोऱ्यात झालेले आढळून येत नाही. खरंतर, कोयना खोऱ्यात भूकंपग्रस्तांच्या अनेक समस्यांसह रोजगार, आरोग्य या मुलभूत गरजा अद्यापि राम भरोसेच आहेत.
अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला यश
कोयनानगर येथे भूकंपात मृत पडलेल्या निष्पाप लोकांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सर्व कोयनावासिय या भूकंपाचा मूक साक्षीदार असलेल्या तीन मंदिर परिसरात एकत्र येतात. 56 वर्ष भूकंपग्रस्तांना श्रध्दांजली वाहण्यासाठी कोयनेत भूकंपग्रस्तांचे स्मृती स्मारकच नव्हते. अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती. शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पुढाकार घेत तीन मंदीर परीसरात भूकंपग्रस्तांचे स्मृती स्मारक उभारण्यासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तीन मंदिर परीसरात हे स्मृती स्मारक उभे राहणार आहे.





