पुणे | बारावी उत्तीर्णांसाठी कमवा आणि शिका योजना

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील निवडक गुणवंत आणि होतकरु मागासवर्गीय विद्यार्थ्यांसठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे कमवा आणि शिका ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. १५ जूनपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्ह परिषदेने केले आहे.
या योजनेंतर्गत झेडपीच्या समाजकल्याण विभागात तीन वर्षासाठी प्रशासकीय काम करण्याची संधी दिली जाईल. तसेच पदवीनंतरच्या नोकरीसाठी आवश्यक विविध ज्ञान- कौशल्ये आत्मसात करून देण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ ( इग्नू) यांच्या बीबीए (सर्व्हिस मॅनेजमेंट) या पदवी अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद सेस फंडातून २० टक्के मागासवर्गीय निधी अंतर्गत विद्यावेतन दिले जाते.
तीन वर्षे विद्यावेतन…
जिल्हा परिषदेतर्फे ही नाविन्यपूर्ण योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या कामापोटी पहिल्या वर्षी ८ हजार, दुसऱ्या वर्षी ९ हजार आणि शेवटच्या वर्षासाठी १० हजार इतके विद्यावेतन प्रत्येक महिन्यासाठी दिले जाईल. तसेच प्रत्येक महिन्याला निवास आणि भोजन यासाठी ४ हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता सुद्धा दिला जाणार आहे.
विद्यार्थ्यांना मिळणार दुहेरी फायदा
जिल्हा परिषदेमध्ये इंटर्न म्हणून सलग तीन वर्षे समाधानकारकरित्या केलेले विद्यार्थ्यांना तिसऱ्या वर्षाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची (इग्नू ) बीबीए म्हणजेच बॅचरल इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (सर्व्हिस मॅनेजमेंट) ही कामातून पदवी आणि तीन वर्षे काम केल्याचे जिल्हा परिषद कार्यालयाकडून प्रमाणपत्र असा विद्यार्थ्याचा दुहेरी फायदा होणार आहे.
तसेच बारावीनंतरचे पदवीचे, स्पर्धात्मक युगामध्ये पुढे जाऊन कामाला येऊ शकणारे कार्याधारीत शिक्षण हे स्वत:च्या मेहनतीच्या कमाईवर करता येणार असल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावण्यास यामुळे मदत होणार आहे.
आॅनलाइन अर्ज करा
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १८ ते २४ वयोगटातील नुकतेच बारावी पास असलेल्या किंवा अर्धवट राहून गेलेल्या पदवीचे शिक्षणपूर्ण करू इच्छिणार्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी (एसी, एसटी, व्हीजीएनटी प्रवर्ग) या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जून आहे. त्यासाठी https://applyignou.mkcl.org/#/ ही ऑनलाइन लिंकवरुन अर्ज करणे आवश्यक आहे.





