डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काम केल्याने मस्क यांच्या अडचणी वाढल्या? गुंतवणूकदाराने केली थेट टेस्लाचे सीईओ पद सोडण्याची मागणी

Elon Musk | अब्जाधीश इलॉन मस्क यांच्या मालकीची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला लवकरच भारतात एन्ट्री करणार आहे. जगभरातील इतर देशांमध्ये देखील कंपनीने गाड्यांची विक्री सुरू केली आहे. सध्या टेस्लाच्या शेअर्सची किंमत स्थिर असली तरीही मागील काही दिवसात यात प्रचंड घसरण दिसून आली आहे. त्यामुळे आता गुंतवणूकदारांकडून देखील मस्क यांच्यावर निशाणा साधला जात आहे. कंपनीच्या प्रमुख गुंतवणूकदाराने थेट मस्क यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
सध्या टेस्लाला अमेरिकेत अडचणीचा सामना करावा लागला आहे. कंपनीच्या कारची विक्री मंदावली असून, यामुळे शेअर्सच्या किंमतीही घसरल्या आहेत.
टेस्लाचे गुंतवणूकदार रॉस गेरबर यांनी अमेरिकन शेअर बाजारातील पडझड आणि टेस्लाच्या शेअर्सच्या घसरणीमुळे मस्क यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मस्क हे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारी कार्यक्षमता विभागाचे प्रमुख म्हणून काम करत असल्याने ते कंपनीवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत, असे रॉस यांनी म्हटले आहे.
एका टीव्ही चॅनेलशी बोलताना रॉस गेरबर म्हणाले की, टेस्लाला एका नवीन सीईओची गरज आहे. मी आजच पहिल्यांदा हे बोलण्याचा निर्णय घेतला आहे. मस्क यांच्याकडून खूप दिवसांपासून कंपनीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे इतर कोणीतरी टेस्ला चालवण्याची जबाबदारी घेण्याची वेळ आली आहे.
ते पुढे म्हणाले की, टेस्ला अनेक महत्त्वाच्या गोष्टी करत आहेत. त्यामुळे एकतर त्यांनी टेस्लामध्ये परत यावे व कंपनीचे सीईओ म्हणून काम करावे. अथवा सरकारच्या कामावर लक्ष केंद्रित करावे. मात्र, त्याआधी कंपनीसाठी योग्य सीईओ शोधणे गरजेचे आहे.
दरम्यान, एका महिन्यात टेस्लाच्या स्टॉकची किंमत 34% घसरून 235 डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर 2024 मध्ये शेअर 488.54 डॉलर या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र, त्यानंतर यात प्रचंड घसरण झाली आहे. त्यामुळे आता प्रमुख गुंतवणूकदार देखील मस्क यांच्याविरोधात बोलताना दिसत आहे.





