Satara : साताऱ्यात मंत्रिपदाची उत्सुकता

सातारा : महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या शपथविधीची तयारी सुरु आहे. याबाबत जोरदार चर्चाही सुरु आहेत. सातारा जिल्ह्यातून उद्या कोणकोणते आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार याविषयी जिल्ह्यात उत्सुकता लागून राहिली आहे. मंत्रिपदाच्या यादीत जिलह्यातून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शंभूराज देसाई, आ. मकरंद पाटील, आ. जयकुमार गोरे यांची नावे चर्चेत आहेत.
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार आहे. साताऱ्यातूनही मंत्रिपदासाठी नावे चर्चेत आहेत. भाजपचे सर्वाधिक चार आमदार जिल्ह्यातून निवडून गेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची भेट घेऊन जिल्ह्यात सर्वाधिक आमदार भाजपचे असल्याने भाजपकडे कॅबिनेट मंत्रिपद व जिल्ह्याचे पालकमंत्रिपद द्यावे अशी विनंती केली आहे.
त्यामुळे साताऱ्यातून कोणाला मंत्रिपद मिळणार याविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.
जिल्ह्यातून शिवेंद्रसिंहराजे. शंभूराज देसाई, मकरंद पाटील, जयकुमार गोरे या चार जणांच्या मंत्रिपदाची चर्चा सुरू आहे. मात्र, राजकारणात कधीही काहीही घडू शकते. त्यातच भाजप आणि महायुती धक्कातंत्र देऊ शकतात. कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केलेल्या आमदार डॉ. अतुल भोसले यांनाही आकस्मिकपणे मंत्रीपद दिले जाऊ शकते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचाराच्या सभेत कराडात तसे संकेत दिले होते. त्यामुळे भाजपने जिल्ह्यात हे धक्कातंत्र वापरले तर आश्चर्य वाटायला नको. असेच दुसरे धक्कातंत्र कोरेगावातही होऊ शकते. आ. महेश शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या खूप जवळ आहेत. राज्यात कुणालाही महामंडळ दिले नव्हते तेव्हा एकनाथ शिंदे यांनी महेश शिंदे यांना महामंडळाची जबाबदारी दिली होती.





