E20 पेट्रोल भरताय? मग सावधान! वाहनांचे पार्ट्स खराब होत असल्याचा SIAM चा गंभीर इशारा
E20 पेट्रोलच्या गुणवत्तेबाबत SIAM ने केंद्र सरकारला इशारा दिला आहे. क्लोराइड व नमीचे प्रमाण वाढल्याने फ्यूल इंजेक्टर, फ्यूल पंप आणि इंजिनचे पार्ट्स खराब होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

E20 : देशभरात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण (E20) वाढविण्याच्या सरकारी धोरणाला वेग आला असतानाच आता त्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वाहन उत्पादकांची संघटना SIAM (सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स) यांनी केंद्र सरकारकडे यासंदर्भात चिंता व्यक्त करत, निकृष्ट दर्जाच्या E20 पेट्रोलमुळे वाहनांतील महत्त्वाचे पार्ट्स अपेक्षेपेक्षा लवकर खराब होत असल्याचा दावा केला आहे. (E20)
SIAM च्या मते, E20 पेट्रोलमध्ये क्लोराइड आणि आर्द्रता (Moisture) यांचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आढळत असून त्यामुळे इंजिन आणि फ्यूल सिस्टीममधील धातूच्या भागांवर गंज निर्माण होत आहे. परिणामी वाहनांच्या देखभाल खर्चात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (E20)
सरकारने OMC कंपन्यांना दिले निर्देश – (E20)
एका हिंदी वाहिनीच्या वृत्तानुसार, SIAM ने पेट्रोलियम मंत्रालयाला पत्र लिहून E20 पेट्रोल देशभर लागू झाल्यानंतर वाहनांच्या अनेक पार्ट्स बदलण्याच्या तक्रारी वाढल्याची माहिती दिली. त्यानंतर पेट्रोलियम मंत्रालय, ऑईल मार्केटिंग कंपन्या (OMCs) आणि वाहन उत्पादक यांच्यात अनेक बैठका झाल्या. या बैठकीनंतर केंद्र सरकारने OMC कंपन्यांना पेट्रोल पंपांवरील इंधनाच्या गुणवत्तेवर अधिक कठोरपणे लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
कोणते पार्ट्स सर्वाधिक प्रभावित? (E20)
SIAM च्या माहितीनुसार, E20 पेट्रोलमुळे सर्वाधिक परिणाम फ्यूल इंजेक्टर, फ्यूल पंप, EGR व्हॉल्व्ह, एक्झॉस्ट सिस्टीम या भागांवर होत असल्याचे दिसून आले आहे. तसेच पेट्रोल किंवा इंजिनमधून बाहेर पडणाऱ्या वायूंच्या थेट संपर्कात येणारे इतर धातूचे पार्ट्स. या सर्व घटकांच्या बिघाडाच्या तक्रारी पूर्वीच्या तुलनेत लक्षणीय वाढल्याचा दावा करण्यात आला आहे.
क्लोराइडमुळे गंज वाढत असल्याचा दावा – (E20)
संस्थेच्या तपासणीत पेट्रोलमधील क्लोराइडचे प्रमाण जास्त असल्यामुळे वाहनांच्या पार्ट्सवर गंज निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. हा गंज हळूहळू धातू कमकुवत करून संबंधित भाग वेळेपूर्वी निकामी करत असल्याचे SIAM ने नमूद केले.
तपासणीत काय आढळले? (E20)
SIAM च्या तपासणीत वाहनांच्या फ्यूल टँकमधून घेतलेल्या काही नमुन्यांमध्ये क्लोराइडचे प्रमाण 500 mg/kg पर्यंत आढळले. तर पेट्रोल पंपांवरून घेतलेल्या नमुन्यांमध्ये हे प्रमाण 350 mg/kg पर्यंत नोंदविण्यात आले. संस्थेच्या मते, इतक्या प्रमाणातील क्लोराइड इंजिन आणि एक्झॉस्ट सिस्टीमसाठी हानिकारक ठरू शकते.
आर्द्रताचे प्रमाणही चिंताजनक – (E20)
क्लोराइडबरोबरच इंधनातील आर्द्रतेचे म्हणजेच ओलाव्याचे प्रमाणही अनेक ठिकाणी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आढळल्याचे SIAM ने सांगितले आहे. काही नमुन्यांमध्ये आर्द्रता 10,000 mg/kg पर्यंत नोंदविण्यात आली, तर निर्धारित कमाल मर्यादा 3,000 mg/kg आहे.
आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यास पेट्रोल आणि इथेनॉल वेगवेगळ्या थरांमध्ये विभक्त होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत वाहनात इंधन भरल्यानंतरही इंजिन बंद पडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
SIAM ची सरकारकडे प्रमुख मागणी –
SIAM ने केंद्र सरकारकडे E20 आणि E85 पेट्रोलसाठी क्लोराइडची कमाल मर्यादा अनिवार्य करण्याची मागणी केली आहे. ही मर्यादा 1 mg/kg पेक्षा कमी ठेवून ती भारतीय मानक ब्युरो (BIS) च्या नियमांमध्ये समाविष्ट करण्याची सूचना संस्थेने केली आहे.
याशिवाय, इंधन मिश्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या इथेनॉलमधील क्लोराइडचे प्रमाणही निश्चित करण्याची गरज असल्याचे SIAM ने नमूद केले. ही मागणी गेल्या दोन वर्षांपासून करण्यात येत असली तरी अद्याप नियमांमध्ये आवश्यक बदल झालेले नसल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.
वाहनधारकांवर काय परिणाम होऊ शकतो?
तज्ज्ञांच्या मते, इंधनाच्या गुणवत्तेत सुधारणा झाली नाही तर वाहनांचे पार्ट्स लवकर खराब होण्याचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे वाहनधारकांचा देखभाल आणि दुरुस्तीवरील खर्च वाढण्याबरोबरच वारंवार सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागू शकते. तसेच अशा तक्रारी सातत्याने वाढल्यास E20 पेट्रोलबाबत ग्राहकांचा विश्वासही कमी होण्याची शक्यता SIAM ने व्यक्त केली आहे. त्यामुळे देशभरात पेट्रोलच्या गुणवत्तेवर कठोर नियंत्रण ठेवून या समस्येचे मूळ कारण तातडीने शोधण्याची मागणी संस्थेने सरकारकडे केली आहे.





