पुणे जिल्हा | इंद्रायणी नदीची मरणासन्न अवस्था

आळंदी, (वार्ताहर) – इंद्रायणी नदीतील पाण्यावर जलप्रदूषणामुळे वारंवार मोठ्या प्रमाणात तवंग (फेस) येत असतो. काही दिवस उलटून गेल्यावर नदीतील पाण्यावर मोठ्या प्रमाणात तवंग येतो. त्यामुळे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात आले असून नदीची मरणासन्न अवस्था झाली असून यास जबाबदार असलेल्यांवर फक्त कारवाई करणार एवढेच टुमणे राज्यसरकार लाऊन आळंदीकरांसह भाविकांची घोर फसवणूक करीत असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक वसाहती, इंद्रायणी नदीकाठच्या कारखान्यातील रसायनयुक्त पाणी, गावांमधील मैलायुक्त पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते. मैलायुक्त पाणी हे इंद्रायणी नदीला प्रदूषित करत आहे.
पिंपरी महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), जिल्हा प्रशासन, ग्रामस्थांच्या पुढाकारातून नदी काठच्या गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारण्याचे नियोजन केले आहे. मात्र, वारंवार आळंदीत पाण्यावर तवंग येत आहेत. एखाद्या अती थंड प्रदेशात ज्याप्रमाणे नदीवर बर्फाची चादर असते तशीच अवस्था इंद्रायणी नदीची झाली आहे.
इंद्रायणी नदी पात्रात लाखो वारकरी मोठ्या श्रद्धेने स्नान करून माऊलींचे दर्शन घेतात. परंतु नदीची अवस्था बघता लाखो वारकर्यांचे आणि आळंदीतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आधीच जलपर्णीने इंद्रायणीचा श्वास गुदमरत आहे. आता त्यात जलप्रदूषणाची भर पडली असून अवघ्या नदी पात्रात तवंग वारंवार दिसून येतो आहे. रसायनयुक्त पाणी सोडल्यानेच नदीची अशी अवस्था झाल्याची चर्चा परिसरात आहे.
दरम्यान, इंद्रायणी नदीत थेट सांडपाणी सोडणार्या कंपन्यांवर कारवाई करा, अशी मागणी वारंवार करण्यात येत असल्याने 2023मध्ये काही कंपन्यांवर शासनाने कारवाई केली होती; मात्र त्यानंतरही परिस्थिती जैसे थेच असल्याने कारवाईचा केवळ फार्सच होता का, असा सवालही उपस्थित करण्यात येत असून नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न मिटणार आहे की, नाही असा ही सवाल उपस्थित केला जात आहे.
मध्यतरी आली होती धक्कादायक माहिती
दैनंदिन वापरातील 60 ते 65 दशलक्ष लिटर (एमएलडी) सांडपाणी प्रतिदिन कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याची धक्कादायक माहिती मध्यतरी समोर आली होती. नदीत घरगुती आणि औद्योगिक सांडपाणी, मैला सोडल्यामुळेच नदी प्रदूषित झाली असल्याचे शिक्कामोर्तब होत आहे.
नागरिकांच्या आरोग्याला धोका
लाखो नागरिक यात स्नान करतात. या नदीत रसायनयुक्त पाणी आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. रसायनामुळे त्वचारोगाच्या समस्या देखील अनेकांना निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, या प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होते. शासनाने या नदीकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि या प्रदूषणावर तोडगा काढण्याचीही गरज असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.





