अमेरिकेत 100 पेक्षा जास्त शहरांमध्ये दसरा महोत्सव

सरकारी निधीचेही पाठबळ,ऑक्टोबर महिना हिंदू संस्कृती मास घोषित
वॉशिंग्टन : जगाच्या कानाकोपऱ्यात विविध देशांमध्ये जशी भारताची लोकसंख्या वाढत आहे तसे भारतीयांचे उत्सवही तेथे पोहोचत आहेत. अमेरिकेतही मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक राहतात. सहाजिकच या वर्षी पहिल्यांदाच येथील 100 पेक्षा जास्त शहरांमध्ये दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
अनेक ठिकाणी स्थानिक सरकारांनी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी या महोत्सवासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. अमेरिकेतील 40 पेक्षा जास्त शहरांमध्ये ऑक्टोबर महिना हा हिंदू संस्कृती मास म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या शहरांमध्ये नवरात्री आणि विजयादशमीनिमित्त रावण दहन रामलीला असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत रामलीला निमित्ताने जे रावण दहन कार्यक्रम होते त्यासाठी रावणाच्या प्रतिमा भारतातून आयात कराव्या लागत होत्या पण आता या प्रतिमा अमेरिकेत तयार होऊ लागल्या आहेत.
अमेरिकेत कार्यरत असलेल्या एशियन उत्सव संघटनेने याबाबत पुढाकार घेतला असून अमेरिकेत जन्माला आलेल्या भारतीयांच्या पुढील पिढीला भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी या दृष्टिकोनातून या सर्व सणांचे आयोजन करण्यात आले आहे. रामलिलाच्या निमित्ताने तरुण पिढीला राम आणि सीता यांची ओळख होत आहे. मोठ्या प्रमाणावर साजरा होणाऱ्या या उत्सवांसाठी केवळ स्थानिक सरकारच निधी उपलब्ध करुन देत आहेत असे नाही तर अमेरिकेतील काही कंपन्यांनी सुद्धा हे उत्सव स्पॉन्सर करण्याचा निर्णय घेतला आहे न्यु जर्सीमध्ये साजरा होणारा दसरा महोत्सव अमेरिकेतील सर्वात मोठा उत्सव मानला जातो.
अमेरिकेत यावेळी सहा ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन होणार आहे सर्व पुतळे अमेरिकेतच तयार करण्यात आले आहेत. त्या व्यतिरिक्त जे रामलीला उत्सव होणार आहेत. त्याची तयारी स्थानिक भारतीय गेल्या आठ महिन्यांपासून करत होते. हा संपूर्ण महिनाच अमेरिकेतील भारतीय हिंदू संस्कृती मासिक मास म्हणून साजरा करणार आहेत. दसर्याच्या पाठोपाठ दिवाळी आणि इतर सणही याच उत्साहाने साजरा केले जाणार आहेत.





