“महायुतीच्या एक वर्षाच्या काळात…”; शिदेंसेनेच्या आमदाराने मनातली खदखद बोलून दाखवली; भाजपवर थेट प्रहार म्हणाले…

MLA Kishore Patil : “महायुतीच्या एक वर्षाच्या काळात एक फुटकी कवडी सुद्धा आमदारांना मिळाली नाही. ” असे विधान करत शिंदेसेनेच्या आमदाराने आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
भाजपच्या बंडखोरांना पुन्हा पक्षात घेतल्याबद्दल शिंदे सेनेचे आमदार किशोर पाटील यांनी मनातली खदखद एका जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवली. शिवसेनेच्या पाचही आमदारांनी ठरवलं, तर जळगाव परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष बसणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच भाजपचे नेते युतीबद्दल बोलतात पण हे कधी पलटी खातील, याचा भरोसा नाही, असे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
नेमकं काय म्हणाले आमदार किशोर पाटील?
महायुतीच्या एक वर्षाच्या काळात एक फुटकी कवडी सुद्धा आमदारांना मिळाली नाही. वर्षभरात एक कवडीही न मिळाल्याने आम्हाला फक्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सहारा आहे. अतिवृष्टीमुळे माझ्या मतदारसंघातील विकासाची भर वर्षभरात काढू शकत नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन पाच टक्के निधीमधून किमान 50 टक्के निधी हा आपल्या मतदारसंघाला द्यावा.
हेही वाचा : बिहारमध्ये मध्यरात्री अटकेचा थरार ! १४० पोलिस अन् अनंत सिंगला अटक ; वाचा संपूर्ण टाइमलाइन
अशी विधान करून आमदार किशोर पाटील यांनी भाजपवर टीकास्त्र डागले आहे. भाजपमध्ये बंडखोरी केली तर पाच वर्ष हकापट्टी होईल, असे विधान भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूर येथे केले होते. त्यांनी केलेल्या विधानाची आठवण करून देत पाटील यांनी बंडखोरी करून पुन्हा भाजपमध्ये दाखल झालेल्यांवर टीका केली. तसेच मंत्री बावनकुळे यांना माझ्या मतदारसंघात बंडखोरी करण्यात आली. असे सांगण्यासाठी फोन करायचो मात्र ते फोन उचलत नव्हते, असा आरोप किशोर पाटील यांनी केला आहे.
भाजपवर शिंदेसेनेच्या आमदाराने टीका केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न तीव्र आहे, यावर भाष्य करताना शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करा, अशी मागणी किशोर पाटील यांनी केली आहे. तसेच आता 30 जूनची तारीख देऊ नका. शेतकरी हा आज त्रस्त झाला आहे, असे देखील ते म्हणाले.
एसआयटीच्या भीतीने…
पाचोरा-भडगाव मतदार संघात आपल्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या सर्व विरोधकांना भाजपने पक्षात घेतले आहे. मात्र जे पक्षात घेतले हे सर्व संस्था चालक आहेत. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्रातील सर्व शिक्षण संस्थांवर एसआयटी लावली. एसआयटीच्या भीतीने हे सर्व भाजपमध्ये गेल्याचा आरोप किशोर पाटील यांनी केला आहे.
शिंदेंचं कौतुक
मुख्यमंत्री जरी भाजपचे असले तरी शिक्षण मंत्री हे शिवसेनेचे आहे हे विसरू नका, असा इशारा त्यांनी नुकत्याच पाचोरा भडगाव मतदार संघातून भाजपमध्ये गेलेल्यांना दिला आहे. आज काय चालले ते माहित नाही. मात्र एकनाथ शिंदे यांच्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री काळात त्यांनी एक दिवसाच्या नायक चित्रपटातील मुख्यमंत्र्यासारखं काम केलं, असे म्हणत आमदार किशोर पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले.





