जुन्नर शहरात नवरात्रीनिमित्त दुर्गामाता दौड
Updated On:

जुन्नर – नवरात्र उत्सवानिमित्त शहरात रोज पहाटे दुर्गामाता दौडीचे आयोजन केले जात आहे. शिवप्रतिष्ठान जुन्नरच्या वतीने आयोजित या उपक्रमात जुन्नर शहर व परिसरातील युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. रविवार पेठेतील ग्रामदैवत मंदिरापासून पहाटे निघणारी ही दौड रोज वेगवेगळ्या देवींच्या मंदिराला भेट देत आरती केली जाते.
ठिकठिकाणी रांगोळ्या, फटाके, फुलांनी दौडीचे स्वागत केले जात आहे. याप्रसंगी ध्वजपूजन, पद्ये-गीते, पाद्यपूजा तसेच भवानी मातेचा जयघोष पारंपरिक वेशभूषेतील युवक-युवती करत आहेत. दरम्यान, मंगळवारी (दि. 24) दसऱ्यानिमित्त महादौडीचे आयोजन केले आहे. यावेळी दौडीचे चौका चौकात स्वागत केले जाते. याप्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवप्रतिष्ठान जुन्नरच्या वतीने करण्यात आले आहे.





