Pune : डंपर चालकाची कोठडीत रवानगी

पुणे : पदपथावर झोपलेल्या मजुरांना चिरडणाऱ्या डंपर चालक गजानन शंकर तोटरे (वय २६, रा. केसनंद) याला अटक केल्यानंतर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी हे आदेश दिले. “आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तोटरे याने कधी, कुठे आणि किती मद्यप्राशन केले होते. त्याच्या बरोबर आणखी कोणी होते का? तसेच त्याकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे का? याचा तपास करायचा आहे.
त्यामुळे त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात यावी,’ असा युक्तिवाद सहायक सरकारी वकील ॲड. विजयसिंह जाधव यांनी केला.
चौकशीत उडवाउडवीची उत्तरे
तोटरेकडे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तपासात तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत आहे. तो चालवत असलेला डंपर कोणाच्या मालकीचा आहे. तो कधीपासून तेथे काम करत आहे, याचा देखील पोलीस तपास करत आहेत.





