पुणे | डमी आडते बाजार समितीच्या रडारवर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – दुबार विक्रीमुळे भाजीपाल्याच्या भावात होणारी वाढ, शेतीमालाला कमी मिळणारा भाव, वाहतूक कोंडी, तसेच १५ फुटांच्या आत माल ठेवण्यासह बाजारातील विविध नियमांचे होणारे उल्लंघन,
या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला विभागातील डमी आडते पुन्हा बाजार समिती प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. उद्यापासून (मंगळवार दि. २५) ठरल्यापेक्षा जास्त प्रमाणात असलेल्या डमींवर कारवाई करण्यात येणार आहे.
एखादा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर डमींवर कारवाई केली जाते. मात्र, त्यानंतर या प्रश्नाकडे प्रशासनाकडून सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे आता तर डमींवर कारवाईत सातत्य राहणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजार समिती प्रशासन आणि आडते असोसिएशन यांच्यात बैठक झाली होती. त्यामध्ये एका गाळ्यावर दोन डमी आणि एक मदतनीस ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती.
डमी आडते कोण असतील, याबाबत त्या गाळाधारकाने दोन नावे लिहून दिली आहेत. त्याशिवाय दुसरे डमी चालणार नाहीत. त्या वेळी कारवाई करण्यात आली. मात्र, कारवाई थांबताच पुन्हा डमी आडत्यांचा बाजारात सुळसुळाट झाला आहे.
एका गाळ्यांवर १० ते १२ डमी आडते असल्याचे चित्र आहे. फळे व तरकारी बाजारात गाळे सोडून काहींनी अक्षरश: रस्त्यांवर दुकाने थाटल्यामुळे कोंडीत भर पडते. त्यामुळे वाहतुक कोंडी होऊन शेतमालाची वाहने खाली करण्याबरोबरच खरेदीदार ग्राहकांनाही रस्त्याने चालने मुश्किल होत असते.
कोथिंबिरीसह विविध पालेभाज्यांचे भाव सध्या वाढले आहेत. दुबार विक्रीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नाही, तर दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे. या पार्श्वभूमीवर डमी आडत्यांवर कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे.
बड्या आडत्यांवर कारवाई होणार का?
बड्या आडत्यांच्या गाळ्यावर डमींची संख्या जास्त आहे. त्यामुळे या कारवाईत बड्या आडत्यांवर कारवाई होणार का, केवळ छोट्या- छोट्या आडत्यांवर कारवाई करून दिखावा केला जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
डमी आडत्यांची संख्या वाढल्याच्या तक्रारी आल्या आहेत. एका गाळ्यावर दोन डमी ठेवण्यास परवानगी आहे. त्यापेक्षा जास्त असलेल्या डमींवर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत विभागप्रमुख आणि गटप्रमुख यांना सूचना दिल्या आहेत. – डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे बाजार समिती





