Dumburwadi Toll Naka : डुंबरवाडी टोलनाक्यावर स्थानिकांना माफी मिळणार? अधिकृत आदेशाबाबत मोठी अपडेट समोर
Dumburwadi Toll Naka : स्थानिक वाहनधारकांच्या संतापाचा उद्रेक; आमदार शरद सोनवणे यांचा टोल प्रशासनासोबत बैठकीत पाठपुरावा.

Dumburwadi Toll Naka – कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील डुंबरवाडी टोलनाक्यावर स्थानिक वाहनधारकांना सध्या टोलमाफी लागू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित केंद्रीय मंत्र्यांकडून अधिकृत लेखी आदेश प्राप्त होईपर्यंत टोलमाफी देता येणार नाही, अशी भूमिका टोल प्रशासनाने घेतली आहे.
डुंबरवाडी टोलनाक्यावर सुरू असलेल्या टोलवसुलीबाबत स्थानिक नागरिकांकडून सातत्याने टोलमाफीची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी टोलमाफीसाठी ठाम पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यांनी टोलनाका व्यवस्थापक योगेश नानकर यांच्यासोबत बैठक घेऊन स्थानिक वाहनधारकांना तात्काळ सूट द्यावी, अशी मागणी केली.
बैठकीनंतर स्थानिकांना दिलासा देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून पुढील स्तरावर पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)चे अधिकारी अमरीश मानकर यांनी सांगितले की, बैठकीतील निर्णयाचा सविस्तर अहवाल केंद्रीय महामार्ग विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
मंत्र्यांचा स्पष्ट लेखी आदेश आल्यानंतरच स्थानिक वाहनधारकांना टोलमाफी लागू करता येईल, असे त्यांनी नमूद केले; मात्र आदेश कधी प्राप्त होणार, याबाबत कोणतीही निश्चित वेळ देण्यात आलेली नाही. तोपर्यंत विद्यमान नियमांनुसार टोल आकारणी सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आदेश येईपर्यंत टोल नको
यावर आमदार सोनवणे यांनी ठाम भूमिका घेत, लेखी आदेश येईपर्यंत स्थानिकांकडून टोल आकारणी करू नये, अशी मागणी केली असून स्थानिकांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, लेखी आदेश प्राप्त झाल्यानंतर डुंबरवाडी टोलनाक्यावर स्थानिक वाहनधारकांना टोलमाफी देण्यात येईल, असे टोलनाका व्यवस्थापक योगेश नानकर यांनी स्पष्ट केले. आता केंद्रीय स्तरावरून काय निर्णय होतो, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.





