Duleep Trophy 2024 : श्रेयस अय्यरचा फ्लॉप शो सुरूच, पुन्हा एकदा शून्यावरच परतला माघारी….

Duleep Trophy 2024 : दुलीप ट्रॉफी 2024 चे दोन सामने अनंतपूर येथे खेळवले जात आहेत. पहिला सामना भारत ब आणि भारत ड तसेच दुसरा भारत अ आणि भारत क यांच्यात खेळला जात आहे. पहिल्या दिवशी दोन्ही सामन्यात 77-77 षटकांचा खेळ झाला.
भारत-अ संघासाठी शाश्वत रावत हा दिवसाचा हिरो ठरला, त्याने दमदार शतक झळकावले, तर भारत-ड संघासाठी संजू सॅमसनने तुफानी खेळी केली. दिवसअखेर तो नाबाद परतला. भारत-ड संघासाठी आणखी तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली आणि संघाची धावसंख्या 300 च्या पुढे गेली.
श्रेयस अय्यर पुन्हा एकदा फ्लॉप….
भारत-ब विरुद्ध भारत-ड सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारत-ब ने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. अशा स्थितीत भारत-ड संघ फलंदाजीसाठी उतरला आणि देवदत्त पडिक्कल (50) आणि केएस भरत (52) यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी अर्धशतके झळकावली. तर कर्णधार श्रेयस अय्यर पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. भारत-ड संघाचा कर्णधार असलेल्या श्रेयस अय्यरची खराब कामगिरी कायम आहे.भारत-ब विरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या डावात श्रेयस अय्यरने निराश केले आणि खाते न उघडताच बाद झाला. श्रेयसचे खाते न उघडता बाद होण्याची ही दुसरी वेळ आहे.
कर्णधार अय्यर जरी फ्लाॅप ठरला असला तरी देवदत्त पडिक्कल आणि केएस भरत यांनी अर्धशतके झळकावली. देवदत्त आणि भरतनंतर रिकी भुईनेही (56) दमदार अर्धशतक झळकावले. संजू सॅमसन 83 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 89 धावा करून तर सरांश जैन 26 धावा करून नाबाद माघारी परतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत-ड संघाने पाच गडी गमावून 306 धावा केल्या होत्या.





