Duleep Trophy 2024 : ईशान किशनच्या शतकाने भारत-क मजबूत स्थितीत….

अनंतपूर :- भारत-क संघाच्या ईशान किशनने केलेल्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर दुलीप करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भारत-क संघाने पहिल्या डावात 5 बाद 357 धावांपर्यंत मजल मारली. स्पर्धेतील अन्य लढतीत भारत-अ संघाने पहिल्या डावात 82 षटकांत 8 बाद 288 धावा केल्या होत्या.
Stumps Day 1: India C – 357/5 in 78.6 overs (MJ Suthar 8 off 11, R D Gaikwad 46 off 50) #IndBvIndC #DuleepTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 12, 2024
दुलीप करंडक स्पर्धेची दुसरी फेरीला गुरुवारपासून सुरुवात झाली. भारत क संघाने पहिल्या डावाला सुरुवात केली. 4 धावांवर असताना सलामीवीर ऋतुराज गायकवाड़ला दुखापत झाल्याने तो परतला. दुसरा सलामीवीर साई सुदर्शन व रजत पाटीदार यांनी पुढे खेळायला सुरुवात केली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 96 धावांची भागीदारी केली. पाटीदार 40 तर साई सुदर्शन 43 धावा करून बाद झाला.
त्यानंतर ईशान किशन फलंदाजीसाठी आला.
ईशान किशन आणि बाबा इंद्रजित यांनी 252 चेंडूत 189 धावांची भागीदारी करताना डावाला आकार दिला. ईशानने 126 चेंडूचा सामना करताना 14 चौकार व 3 षटकारांच्या साहाय्याने 111 धावांची खेळी केली. त्यानंतर बाबा इंद्रजित देखील 78 (9 चौकार) धावांची खेळी करून परतला. इंद्रजित नंतर अभिषेक पोरेल (8) देखील झटपट परतला. त्यानंतर 4 धावांवर असलेल्या ऋतुराज गायकवाड पुन्हा मैदानात आला. पहिल्या दिवस अखेर ऋतुराज 46 (7 चौकार, 2 षटकार) व मानव सुथर 8 धावांवर खेळत होते.
शम्स मुलाणी, तनुष कोटियन यांची अर्धशतके…
स्पर्धेतील अन्य लढतीत भारत-अ संघाने पहिल्या डावात 82 षटकांत 8 बाद 288 धावांपर्यंत मजल मारली. सलामीची फळी कोसळल्यानंतर शम्स मुलाणी व तनुष कोटियन यांनी एकामेकांना पूरक फलंदाजी करताना संघाचा डाव सावरला.
Stumps Day 1: India A – 288/8 in 81.6 overs (S K K Ahmed 15 off 14, Shams Mulani 88 off 174) #IndAvIndD #DuleepTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 12, 2024
शम्स मुलाणीने 174 चेंडूत 8 चौकार व 3 षटकारांच्या साहाय्याने नाबाद 88 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूने तनुष कोटियन 80 चेंडूत 53 धावांची खेळी करून परतला. रियान परागने 37 धावांचे योगदान दिले. भारत-ड संघाकडून हर्षित राणा, विद्वथ कवेरप्पा व अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 2 गडी तर सारांश जैन व सौरभ कुमार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.





