पुणे | सत्ताधाऱ्यांच्या विधानांमुळे आरक्षणाचा वाद वाढतोय

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “सत्ताधारयांनी मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबतचा प्रश्न सोडविण्यासाठी सुसंवाद साधण्याची व सामंजस्याची भूमिका घेतलेली दिसत नाही. सत्ताधाऱ्यांच्या विधानांमुळे राज्यात आरक्षणाबाबतचा वाद आणखी वाढत आहे,’ असे मत राष्ट्र्वादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे व्यक्त केले. आता राज्यात शांतता प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे, असेही पवार म्हणाले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात मराठा समाज व ओबीसीच्या आरक्षणाबाबतचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे दोन्ही समाजाचे नेते आरक्षणासाठी आंदोलने करत आहेत. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
याबाबत पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. “झालं गेलं सोडून द्या, आरक्षणाच्या प्रश्नात मार्ग काढावा लागेल अशी विनंती भुजबळ यांनी केली आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी आंदोलकांशी संवाद साधून चर्चा करुन काय-काय आश्वासने दिली, हे आम्हाला माहिती नाही. त्यांनी निर्णय घेताना विरोधकांना विश्वासातच घेतलेले नाही,’ असे पवार यांनी सांगितले.
अजित पवार यांनी विकासकामे करूनही लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा बारामतीत पराभव कसा काय झाला? असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर पवार म्हणाले, “अरे ती बारामती आहे. मतदारांशी सुसंवाद होता. त्याचाच फायदा झाला. त्यामुळे बारामतीत कुणी काहीही म्हटले तरी खात्री होती की, सुप्रिया सुळेंनाच अधिक मतदान होईल. घरातलाच विरोधी उमेदवार असतानाही ४० हजारांचे लीड मिळाले,’ असेही पवार यांनी नमुद केले.
शरद पवार म्हणाले…
– दोन पिढीतील संवाद कायम ठेवला, तर लोक कधीही नेत्याला विसरत नाहीत.
– विधानपरिषद निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. पण, यात कोणी-कोणाला फसवले नाही. पाटील यांच्या विजयाबाबत काही रणनीती ठरविण्यात आली होती. मात्र, त्याबाबत मतभिन्नता निर्माण झाली. त्यामुळेच आवश्यक तेवढी मते मिळाली नाहीत.
– मी म्हणेल तोच निर्णय घेण्याबाबतची प्रवृत्ती प्रशासनात वाढत आहे. प्रशासन व मंत्रिमंडळ यांच्यात सुसंवाद कमी झाला आहे. त्याचे काही विपरित परिणाम पहायला मिळतात.
– आर्थिक सुबत्ततेबाबत देशात महाराष्ट्र अकराव्या क्रमांकावर आहे. राज्यावर कोट्यवधी रुपयाचे कर्ज असून, ही चिंताजनक बाब आहे. राज्य आर्थिकदृष्ट्या सावरले पाहिजे.
घरात सर्वांना जागा, पण…
अजित पवार गटातील काहीजण शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. अजित पवारांमुळे भाजपमध्ये अस्वस्थता असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे अजित पवार पुन्हा आले, तर त्यांना घरात घेणार का? पक्षात जागा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पवार म्हणाले, “निवडणुका येतात अन् जातात.
मात्र, घरे कायम राहतात. घरात सर्वांना जागा आहे. पण, पक्षात जागा आहे की नाही याबाबत व्यक्तिगत मी निर्णय घेणार नाही. संघर्षाच्या काळात सर्व सहकारी माझ्याबरोबर मजबुतीने उभे राहिले. त्यांना पहिल्यांदा विचारावे लागणार आहे.’





