पुणे जिल्हा | इंद्रायणीच्या प्रदूषित पाण्यामुळे शेती नको रे बाबा!

चिंबळी, (वार्ताहर) – इंद्रायणी नदी वारंवार फेसाळतेय, हिरवीगार जलपर्णीची झालर, आधुनमधून काळेकुट्ट दिसणारे दुर्गंधीयुक्त पाणी, जवळ उभे राहताच नाक बंद करावेसे वाटणे अशी अवस्था चिंबळी-मोशी हद्दीतील इंद्रायणी नदीवर उभारण्यात आलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्यातील आहे. दरम्यान, हेच प्रदूषित पाणी थेट कुपनलिका, विहिरींमध्ये उतरत असल्याने शेतीपिकांची समस्या गंभीर झाली आहे.
इंद्रायणी नदीमध्ये लोणावळा, देहू, तळवडे, चिखली, मोशी, चाकण आदी भागांतील विविध रसायन कंपन्यांचे दूषित पाणी, भंगार गोडाऊनमधील पाणी, सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प न उभारणार्या काही इमारतींमधील सांडपाणी जवळच्या नाल्यांमध्ये सोडले जाते. हे नाल्याचे पाणी नदीमध्ये येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त म्हणून मोकळा श्वास कधी घेणार, असा प्रश्न यामुळे वारंवार उपस्थित होत आहे. पिढ्यानपिढ्या इंद्रायणीलगत अनेक शेतकरी शेती करत आहेत. मात्र, दूषित पाण्यामुळे शेतीचेही काही प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे सध्या एकही शेतकरी नदीच्या पाण्यावर शेती करीत नसला तरी नदीचे पाणी कुपनलिका, विहिरींमध्ये येत असल्याने पिकांसह जमिनीची पोत नाहिसा होत असल्याने शेती करावी की नाही असा सवाल नदीकाठच्या शेतकर्यांनी उपस्थित केला आहे.
केवळ आश्वासनांचे गाजरच
रसायनमिश्रित इंद्रायणी नदीतील पाण्यामुळे शेतीचे नुकसान होऊन बोअरवेल्स आणि विहिरींचे पाणी दूषित होणे अतिशय गंभीर बाब आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी, मंत्री आदींकडे मांडल्या आहेत मात्र केवळ आश्वासनांशिवाय काहीच मिळत नसल्याने इंद्रायणी नदी मोकळा श्वास घेणार आहे का, असा सवाल वारंवार उपस्थित होत असला तरी त्याचे उत्तर कोणाचकडे नाही मात्र वास्तव आहे.





