Basmati rice: इराणमधील आर्थिक संकटामुळे 2 हजार कोटींचा बासमती तांदूळ पडून; शेतकरी संकटात

नवी दिल्ली – इराणमधील आर्थिक पेचप्रसंगामुळे इराणला निर्यात होणारा दोन हजार कोटी रुपयांच बासमती तांदूळ पडून आहे. अमेरिकेने इराणविरोधातील आर्थिक निर्बंध कडक केल्यामुळे इराणच्या चलनाचे मूल्य ढासळले आहे. अशा परिस्थितीत आयातीला अनुदान देण्याचा निर्णय इराणने रद्द केला आहे. त्यामुळे इराणला निर्यात परवडत नसल्याचे बासमती तांदळाच्या निर्यातदारांनी सांगितले.
यामुळे पंजाब आणि हरियाणातील बासमती तांदूळ उत्पादक शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. या शेतकर्यांना पर्यायी बाजारपेठा आहेत. मात्र त्यासाठी वेळ कमी आहे. यामुळे सरकारने यात हस्तक्षेप करण्याची मागणी या शेतकर्यांनी केली आहे. अगोदर भारत -इराण दरम्यान वस्तूच्या बदल्यात वस्तू पद्धतीने व्यापार केला जात होता. मात्र आता तो अमेरिकेच्या निर्बंधामुळे थंडावला आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानला होणारी तांदळाबरोबरच चहा आणि औषधाची निर्यातही थांबली आहे.





