पिंपरी | पितृपक्षाचे कारण, बिघडले बाजारपेठेचे अर्थकारण

कामशेत, (वार्ताहर) – आपल्या पितरांचे स्मरण करण्याचा पंधरवडा म्हणजे पितृपक्ष. हिंदू धर्मातील लोक आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी भाद्रपद वद्य पंधरवड्यात रोज एका तिथीला तर्पण, पिंडदान, दान, जप आदी कर्म करतात.
या काळात कोणतेही शुभकार्य करू नये, मोठे आर्थिक व्यवहार करू नये, नवीन खरेदी करू नये, अशी श्रद्धा जनमाणसात आहे. परंतु जनमाणसातील या समजाचा परिणाम बाजारपेठेवर होताना दिसत आहे.
पितृ पंधरवड्यात आपले पितर पृथ्वीवर येतात आणि पिंडाच्या प्रसादाने संतुष्ट होतात. तसेच आपल्या वारसांना आशीर्वाद देऊन जातात, असे मानले जाते. त्यानुसार घरोघरी १५ दिवस तिथीनुसार पक्ष, श्राद्ध आदी विधी केले जातात.
यादरम्यान पितरांना नैवेद्य दाखविणे, काक स्पर्श घडविणे आणि अन्नदान करणे आदी प्रथा प्रचलित आहेत. त्यामुळे पितृपक्षासाठी लागणाऱ्या भाज्या, वस्तू, तसेच किराणा वस्तू महाग झाल्या आहेत. परंतु हा एकमेव घटक वगळल्यास अन्य वस्तूंच्या खरेदीत मात्र घट झाल्याचे दिसत आहे.
पितृ पंधरवडा शुभच…
पितृ पंधरवडा हा पितरांच्या श्राद्ध कर्माचा पक्ष असल्याने तो अशुभ मानला जातो. तसेच या १५ दिवसांत घरात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. की, नव्या कार्याचा आरंभ केला जात नाही. मात्र, अभ्यासक आणि पंचांगकर्त्यांच्या मते पितृ पंधरवडा शुभच असून आपली दैनंदिन कामे करण्यास कोणतीही हरकत नसते.
भाजीपाल्याचे दर कडाडले –
पितृपक्षाच्या पार्श्वभूमीवर नैवेद्यासाठी आवश्यक असणाऱ्या भाजीपाल्यांचे दर कडाडले आहेत. भाजीपाल्याची आवक घटल्याने दर वधारले आहेत. पितृपक्षामुळे फुलांची मागणी कमी झाली आहे.
मात्र, श्राद्धासाठी लागणारी विड्याची पाने, सुपारी, केळीची पाने, पत्रावळी, द्रोण, गुलाल, कापूर, कुंकू, हळद, माळा, तांदूळ आदींची मागणी वाढली आहे. त्यामुळे १५ दिवस बाजारपेठेत संमिश्र खरेदी राहील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.





