कलेढोण भागात फोर्स लोडशेडिंगमुळे शेतकरी हैराण शेतीसाठीच्या फिडरवरीलच विजेची पाच पाच तास कपात

कलेढोण- ग्रामीण भागात वीज वितरण करण्याठी गावठाण आणि शेती फिडर असे वीज वितरण कंपनीने दोन भागात वर्गीकरण केले आहे. सध्या महावितरण कंपनीने सर्वत्र फोर्स लोड शेडिंग सुरू केले आहे. कधीही अचानक सकाळी, दुपारी, संध्याकाळी, कोणत्याही वेळी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार एक हजार मेगावॅट इतक्या विजेचा तुटवडा निर्माण झाला असल्याने संपूर्ण राज्यभर वीज कपात करण्याचे तास वाटून दिले आहेत. त्याप्रमाणे टप्याटप्प्याने वीज कपात करण्याचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून येत आहेत. त्याप्रमाणे वीजपुरवठा खंडित करावा लागत आहे. त्यामुळे या वीजकपातीस आम्हास जबाबदार धरू नये असे प्रसिद्धीपत्रकही काढण्यात आले आहे.
मात्र, ही कपात करताना केवळ शेती फिडरवरील म्हणजेच शेतीसाठी लागणाऱ्या फिडरवरीलच वीज कपात केली जात आहे, असे निदर्शनास येत आहे. संध्याकाळी पाचपासून नऊ वाजेपर्यंत पाच तास वीज पुरवठा खंडित केला जात आहे. ही वीजकपात शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक असल्याने वीज वितरण कंपनीबद्दल शेतकऱ्यांच्या मनात रोष निर्माण झाला आहे. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. शेतीला पाणी द्यायची गरज नाही.
विजेवर चालणारी महागडी उपकरणे बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात नसतात. शेतकरी घरात दिवसभर एसी, पंखे लावून हवा खात बसत नाहीत किंवा कष्टाच्या घामाने भिजलेले कपडे तो दररोज वॉशिंग मशीनमधे धुत नाही, थकून भागून आल्या नंतर तो फ्रिजमधले थंड पाणी पीत नाही. त्यांच्या घरात केवळ एक दोन चार विजेवर चालणारे बल्ब, करमणुकीसाठी लावलेला टीव्ही यापलीकडे विजेचा वापर होणारी इलेक्ट्रिक उपकरणे असतात. विजेचा विनाकारण वापर न करणाऱ्या शेतकऱ्याला विजेची खरी गरज असते ती म्हणजे त्यांचा शेतात असणारे वीज पंप, जनावरांच्या चाऱ्यासाठी कडबाकुट्टी करण्याच्या यंत्रासाठी किंवा गायी म्हशींचे दूध काढण्यासाठी लागणारे मशीन यासाठीच. दिवसभर शेतात मळ्यात राबून संध्याकाळी घरी आल्यानंतर शेतकऱ्यांची घाई असते जनावरांचा चारा तयार करणे, गायी म्हैशीच्या धारा काढणे, गृहिणीची स्वयंपाक करण्याची लगबग सुरू असते आणि अशातच रात्री वीजपुरवठा खंडित झाला तर त्यांचे हालच होतात .
शेतकऱ्यांना मिळतात फुकटचे सल्ले
फोर्स लोड शेडिंगचा प्रकार शेतकरी, पशुपालक यांच्यासाठी नुकसानीचा आहे. जे खरच विजेचा अतिवापर करीत आहेत त्यांची वीज कपात केली जात नाही. मात्र, शेतातील वीज रात्रीच्या वेळी कपात करण्याचा महावितरण कंपनीचा निर्णय तुघलकी आहे. याबाबत अधिकाऱ्यांचाकडे दाद मागितली असता निरर्थक उत्तरे येत आहेत. आमच्या हातात काही नाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी करा. आयोगाकडे तक्रार करा, पर्यायी व्यवस्था करून ठेवा इन्व्हर्टर घ्या, शेतात राहू नका, असे फुटकचे सल्ले सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिले जात आहेत. अशा गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा अज्ञात स्थळी आत्मदहन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी व वीज ग्राहकांनी दिला आहे.





