पुणे | दिवाळीमुळे भुसार बाजारात उलाढाल वाढली

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – दिवाळी सणाला उद्यापासून (सोमवार) सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डात फराळासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी मार्केट यार्डात गर्दी होत आहे. दुकानदारांसह किरकोळ ग्राहकही मोठ्या संख्येने बाजारात येत आहे. दरम्यान, मटकी आणि मटकीडाळीच्या दरातील घसरण सुरूच असून, गेल्या आठवड्यातही दरात मोठी घट झाली. मागणीअभावी हरभराडाळ, बेसन, साखरेचे दरही उतरल्याचे सांगण्यात आले.
बाजारात साखरेची आवक मुबलक प्रमाणात होत आहे. मात्र, अपेक्षित मागणी नसल्यामुळे दर मंदीतच आहेत. गेल्या आठवड्यातही साखर दरात क्विंटलमागे आणखी पंचवीस रुपयांनी घट झाली. पिठी साखरेस देखील मागणी साधारणच असल्याचे सांगण्यात आले.
दिवाळीची खरेदी संपल्यामुळे गुळाची उलाढालही मंदावली आहे. गेल्या आठवड्यात गुळाचे दर सर्वसाधारणपणे स्थिर होते. दरम्यान, डाळींच्या दरात घसरण झाली आहे. आवक मंदावल्यामुळे केवळ तुरडाळीच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली.
मात्र, हरभराडाळीस उठाव नसल्यामुळे दरात क्विंटलमागे ३०० रुपयांनी घट झाली. यंदा राजस्थानात मटकीचे पीक मोठे असून, उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. यामुळे नवीन आवक सुरू होताच राजस्थान मटकीच्या दरात घसरण सुरू झाली आहे.
याचा परिणाम, गावरान, पॉलिश, तसेच सेलम मटकीवरही झाला. गेल्या आठवड्यातही गावरान, पॉलिश आणि राजस्थान मटकी दरात क्विंटलमागे आणखी पाचशे रुपयांनी घट झाली.
गेल्या महिन्याभरात मटकीच्या दरात क्विंटलमागे सुमारे एक हजार ते पंधराशे रुपयांनी घट झाली आहे. अन्य डाळी आणि कडधान्यांना मागणी कमी असून, दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले. हरभराडाळीचे दर उतरल्यामुळे बेसन दरातही ५० किलोमागे शंभर ते दीडशे रुपयांनी घट झाली.
गहू, ज्वारी, बाजरी, तसेच तांदळाच्या दरातही फारसा बदल आढळला नाही. नाफेडने पूर्वी खरेदी केलेल्या गोटा खोबऱ्याची अलिकडेच विक्री केली असून, हा माल बाजारात विक्रीसाठी आला आहे.
हा माल जुना असल्याने खराब निघण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे हलक्या प्रतीच्या खोबऱ्याचे दर कमी झाले आहेत. मात्र, उत्तम प्रतीच्या राजापुरी खोबऱ्याची आवक कमी असून, दर तेजीतच असल्याचे सांगण्यात आले.
कर्नाटक, तसेच गुजरातमधून नव्या शेंगदाण्याची आवक सुरू झाल्यामुळे शेंगदाण्याचे दर उतरले आहेत. सर्व प्रकारच्या शेंगदाण्याचे दरात क्विंटलमागे दोनशे रुपयांनी घट झाल्याचे सांगण्यात आले.
खाद्यतेलाला मागणी आहे. मात्र, दिवाळीच्या तुलनेत ती कमी आहे. सोयाबीन, तसेच सरकीची आवक वाढत असल्यामुळे सोयाबीन तेल आणि सरकी तेलाच्या दरात १५ किलोच्या डब्यामागे पंचवीस रुपयांनी घट झाली.
मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे पामतेल आणि सूर्यफुल तेलाची आयात लांबच्या मार्गाने होत आहे. यामुळे आयातीचा खर्च वाढला आहे. यामुळे या दोन्ही तेलाच्या दरात १५ किलोमागे आणखी पंचवीस रुपयांनी वाढ झाली. वनस्पती तूप आणि खोबरेल तेलाचे दर स्थिर होते.
बाजारातील दर पुढीलप्रमाणे –
साखर (प्रतिक्विंटल) ३८५-३९०० रु.
खाद्यतेले (१५ किलो/लिटर):- शेंगदाणा तेल २५००-२६००, रिफाइंड तेलः २३००-२८५०, सरकी तेल
१९००-२२००, सोयाबीन तेल १८८०-२१५०, पामतेल १८५०-२०००, सूर्यफुल रिफाइंड तेल १९००-२०००,
वनस्पती तूप १८४०-२३००, खोबरेल तेल ३३००-३४०० रु.
तांदूळ :- गुजरात उकडा ३५००-४०००, मसुरी ३५००-४०००, सोना मसुरी ४५००-५०००, एचएमटी कोलम ५५००-६५००, लचकारी कोलम ६५००-७०००, चिन्नोर ४५००-५०००, (११२१)-११०००-११५००, आंबेमोहोर (सुवासिक) ७०००-८०००, बासमती अखंड १२०००-१३०००, बासमती दुबार ९५००-१००००, बासमती तिबार १००००-१०५००, बासमती मोगरा ५५००-६५००, बासमती कणी ४०००-४५००, (१५०९) – ८५००-९५००, इंद्रायणी ५५००-६००० रु.
गहू – सौराष्ट्र लोकवन नं. १- ४३००-४५००, सौराष्ट्र लोकवन नं. २- ३८००-४०००, एमपी लोकवन नं. १ – ४२००-४४००, नं. २ – ३७००-४०००, नं. ३ – ३३००-३५००, सिहोर ५६००-६०००, सिहोरी ४३००-४३००, मिलबर ३२००-३२५० रु.
ज्वारी :- गावरान नं. १- ५१००-५४००, गावरान नं. २- ४०००-४४००, नं. ३- ३३००-३४००, दुरी नं. १- ३२००-३३००, दुरी नं. २- ३०००-३१०० रु.
बाजरी :- महिको ३४००-३८००, गावरान ३२००-३४००, हायब्रीड २८००-३१०० रु.
गूळ:- गूळ एक्स्ट्रा ४२५०-४४००, गूळ नं. १- ४१००-४२५०, गूळ नं. २- ३९५०-४०२५ गूळ नं. ३- ३८००-
३८७५, बॉक्स पॅकिंग ३८००-५००० रु.
डाळी:- तूरडाळ १३०००-१६०००, हरभराडाळ ८५००-८७००, मूगडाळ १००००-१०५००, मसूरडाळ ७४००-
७५००, मटकीडाळ ८५००-८६००, उडीदडाळ ११०००-१२५०० रु.
कडधान्ये:- हरभरा ८४००-८५००, हुलगा- ७२००-७५०० चवळी ९०००-११००, मसूर ६८००-६९००, मूग
८५००-९३००, मटकी गावरान ७५००-८०००, मटकी पॉलिश ६०००-६६००, मटकी गुजरात ६०००-
६५००, मटकी राजस्थान ६०००-६५००, मटकी सेलम ९५००-९७००, वाटाणा हिरवा १५०००-१८०००,
वाटाणा पांढरा ४३००-४४००, काबुली चणा ११०००-१५००० रु.
साबुदाणा :– साबुदाणा नं.- १ ६५००, साबुदाणा नं. २ – ६०००, साबुदाणा नं. ३- ५८०० रु.
वरई भगर :- १०५००, सावा भगर १०००, गोटा खोबरे १६०-२२० रु.
शेंगदाणा :- जाडा १०००-१०५००, स्पॅनिश – १०००-१०४०० घुंगरू १०००० टीजे ८२००-८३०० रु.
धने :- गावरान ९०००-१००००, इंदूर १२०००-१५००० रु.
पोहे :- मध्य प्रदेश ४६००-४८००, पेण ४५००-४६००, मध्यम पोहा ४४००-४६००, दगडी पोहा ४४००-४८००, पातळ पोहा ५१००-५७००, सुपर पोहा ४९००-५४००, भाजका पोहा ६५०-७५०, मका पोहा ६७५-७७५, भाजके डाळे ४२००-४८००, मुरमुरा सुरती (९ किलोस) ५७०, भडंग ८५०-१०००, घोटी ५३०, सुरती ५७० रु.
रवा, मैदा, आटा – (५० किलोचा भाव) आटा १७५०-१८००, रवा १९३०-१९८०, मैदा १९३०-१९८०,
बेसन :- (५० किलोस) ४९००-५२०० रु.
मीठ :- मीठ खडे (५० किलोस) २२५, मीठ दळलेले (५० किलोस) २५० रु.
मिरची:- काश्मिरी ढब्बी ३५०००-३८०००, ब्याडगी २००००-२३०००, लवंगी तेजा २००००-२२०००, गुंटूर १८०००-२००००, खुडवा गंटूर ८०००-९०००, खुडवा ब्याडगी ९०००-१०००० रु.
नारळ :- (शेकड्याचा भाव): नवा पॅकिंग २०००-२२००, मद्रास ३५००-३७००, पालकोल जुना २१००-
२२००, सापसोल ३९००-३५०० रु.





