पुसेगाव, (प्रतिनिधी) – बऱ्याच वर्षांनी मृग नक्षत्रात चांगला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी खरीपाचे पिकाचे पेरण्या पूर्ण केल्या .परंतु त्यानंतर सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बुध, पुसेगाव परिसरातील भागातील जोमात आलेली खरीप पिके कोमात जाऊ लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. पावसाने उघडीप न दिल्यामुळे खरीप पिकांची पेरणी झालेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरीप हंगाम हातातून जाण्याची परिस्थिती सध्या सर्वत्र दिसून येत आहे. दररोज पडत असलेल्या पावसामुळे सर्वांचीच दाणादाण उडवली आहे. सोयाबीनची विक्रमी पेरणी खरीपामध्ये शेतकरी करत असतो. सतत पडत असलेल्या पावसामुळे जमिनीचा वाफसा येऊ शकला नाही. त्यातच पाण्याचा निचरा होणारी जमीन सोडली तर ओलसर जमिनीतील पिकांची अंतर मशागत होऊ शकली नाही. त्यामुळे शेतात पिकांपेक्षा तणांचे साम्राज्य वाढले आहे. सोयाबीन सारखे पीक तसेच नगदी पीक म्हणून पाहिले जाणारा घेवडा, त्याच बरोबर वाटाणा, मूग आधी पिकावर सततच्या ढगाळ वातावरणामुळे व रिपरीप पावसामुळे किडीचा व अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. तर शिवारात साचून राहिलेल्या पाण्यामुळे कंदवर्गीय भाज्या व भाजीपाला पिके सडू लागली आहेत.त्यातच बहुतांश शेतकऱ्यांनी कांद्याची लागण करण्यासाठी टाकलेली रोपे जमिनीच्या अति ओलाव्याने पिवळी पडू लागली आहेत. शेतीला तळ्याचे स्वरूप काही ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाली आहे .त्यामुळे सर्वत्र खरीपाची पिके कोमेजून पिवळी पडू लागली आहेत. बळीराजाची आर्थिक गणित खरीप हंगाम वर अवलंबून असते. आणि तोच खरीप यंदाही अति प्रमाणात पडत असलेल्या पावसामुळे अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीसाठी केलेला हजारो रुपये खर्च कसा भरून काढायचा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे.