Corona Vaccine: उद्या महाराष्ट्रात ‘ड्राय रन’; वाचा संपूर्ण माहिती…

मुंबई – केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उद्या, शुक्रवारी राज्यातील 30 जिल्हे व 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये करोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 3 आरोग्य संस्था व प्रत्येक महापालिकेमध्ये 1 आरोग्य संस्था याठिकाणी ड्राय रन घेण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
या मोहिमेची पूर्वतयारी करण्यात आली असून राज्य स्तरावरुन जिल्ह्यांचे युझर आयडी तयार करणे, जिल्हा स्तरावरुन आरोग्य संस्थेचे व लसीकरण पथकाचे युझर आयडी तयार करण्याचे काम झाले आहे.
जिल्ह्यांनी चाचणी लाभार्थ्यांची निवड करून कोविन ऍपमध्ये लसीकरण सत्र तयार करणे आणि त्याचे मॅपिंग करणे, चाचणी लाभार्थ्यांची माहिती कोविन पोर्टलवर अपलोड करणे, लाभार्थी व आरोग्य सेविकेचे सत्र स्थळ निश्चित करणे, लस वाटप करणे व शीतसाखळी केंद्राला कळविणे, आरोग्य सेविकेला सत्राचा दिवस व वेळ कळविणे, लसीकरण अधिकारी 1 ते 4 आणि पर्यवेक्षक यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्यांना त्याची माहिती देणे आदी पूर्वतयारी करण्यात आली. यासंदर्भात काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
या ड्राय रनमध्ये सत्र स्थळावर चाचणी लाभार्थ्यांचे निरीक्षण करून एका केंद्रावर 25 लाभार्थ्यांना लसीकरण केले जाईल. लाभार्थ्यांना त्यांच्या कोविन ऍपवरील नोंदणीनुसार कक्षात सोडले जाईल. त्यानंतर कोविन ऍप्लिकेशनमध्ये लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरणाच्या माहितीची नोंद कोविन ऍपमध्ये करण्यात येईल.





