कराडमध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह’चा थरार; मद्यधुंद डॉक्टरने दोन दुचाकींसह तिघांना उडवले

कराड : मद्यधुंद डॉक्टरने दोन दुचाकीसह दोन महिला व एका वृद्ध व्यक्तीला उडवले. या ’ड्रंक अँड ड्राईव्ह’ अपघातात तिघे गंभीर जखमी झाले. आगाशिवनगर-मलकापूर, ता. कराड येथील शिवछावा चौकात बुधवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर कराड ढेबेवाडी रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
संबंधित मद्यधुंद डॉक्टरला पोलीस कर्मचार्यांनी महामार्ग पोलीस चौकीत ताब्यात घेतले. डॉ. राजाराम लक्ष्मण जगताप (रा. कार्वे, ता. कराड) असे डॉक्टरचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता अनिल भंडारे, मंगल वसंतराव मांडवकर (दोघीही रा. दत्त मंदिरमागे, आगाशिवनगर) व पोपट बाबुराव साळुंखे (रा. आगशिवनगर) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगीतले की, डॉ. राजाराम जगताप हा कारमधून कराडच्या दिशेने जात होता. कराड-ढेबेवाडी मार्गावर मोरया कॉम्प्लेक्स ते शिवछावा चौक या 200 मीटरच्या अंतरात कारने दोन दुचाकींसह एक वृद्ध व मायलेकींना उडवले. या अपघातात वृद्धाच्या पायावरून कार गेल्यामुळे गंभीर जखमी झाला. तर चालत घरी निघालेल्या मायलेकींना धडक दिल्याने त्या दोघी उडून रस्त्याकडेल्या लावलेल्या दुचाकीवर आदळल्या. त्यामध्ये त्या दोघीही गंभीर जखमी झाल्या.
अपघाताची खबर कळताच. कराड शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप सूर्यवंशी यांच्यासह कर्मचारी तातडीने अपघातस्थळी धावले. जखमींना तातडीने उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.





