युक्रेनची हजारो किलोमीटर दूरवरून चाल, ड्रोनने उडवली ४० विमाने… नेमकं काय घडलं…

किव्ह | Drones shot down 40 planes – युक्रेननेने रशियाच्या हद्दीत खोलवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात ४० हून अधिक रशियन विमाने नष्ट केली आहेत. हा हल्ला करण्यासाठी दीड वर्षांहून अधिक काळ लागला आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी वैयक्तिकरित्या त्याचे पर्यवेक्षण केले, असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.
युक्रेनच्या सैन्याने रशियन विमानांना लक्ष्य केले असून या विमानांमध्ये टीयू-९५ आणि टीयू-२२ स्ट्रॅटेजिक बॉम्बर या लढाऊ विमानांचाही समावेश होता. ही विमाने रशियाकडून युक्रेनवर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा मारा करण्यासाठी तैनात केली जात असत, असा दावा युक्रेनच्या देशांतर्गत सुरक्षा एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
रशियाच्या सीमेपासून हजारो किलोमीटर अंतरावर पूर्व सायबेरियातील एका तळावर हल्ला करणारे युक्रेनचे हे आजपर्यंतचे सर्वात मोठे ड्रोन-आधारित ऑपरेशन होते. युक्रेनच्या ड्रोननी इर्कुत्स्क प्रदेशातील स्रेड्नी वस्तीतील एका लष्करी तुकडीवर हल्ला केला, असे रशियातील इर्कुत्स्क ओब्लास्टचे गव्हर्नर इगोर कोब्झेव्ह म्हणाले.
दरम्यान रशियाने देखील युक्रेनवर सर्वात जास्त ड्रोन टाकले, असे युक्रेनच्या हवाई दलाने रविवारी सांगितले. युक्रेनवर ४७२ ड्रोन सोडण्यात आल्याचे हवाई दलाने सांगितले. रशियन सैन्याने ड्रोनसोबत सात क्षेपणास्त्रेही सोडली, असे युक्रेनच्या हवाई दलाचे संपर्क प्रमुख युरी इग्नाट यांनी सांगितले.
युक्रेनने दाखवली चर्चेची तयारी | Drones shot down 40 planes
युक्रेन सोमवारी रशियासोबत थेट शांतता चर्चेच्या नवीन फेरीसाठी इस्तंबूलला एक शिष्टमंडळ पाठवेल, असे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले. संरक्षण मंत्री रुस्तेम उमरोव्ह युक्रेनियन शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. आम्ही आमच्या स्वातंत्र्याचे, आमच्या राज्याचे आणि आमच्या लोकांचे रक्षण करण्यासाठी सर्वकाही करत आहोत, असे टेलिग्रामवरील एका निवेदनात, झेलेन्स्की यांनी रविवारी सांगितले.
यापुर्वी इस्तंबुलमध्ये झालेल्या पहिल्या थेट चर्चेमध्ये कोणताही ठोस निर्णय होऊ शकलेला नव्हता. केवळ दोन्ही बाजूंच्या युद्धकैद्यांची आदलाबदल करण्यावर एकमतहोऊ शकले होते. त्यानुसार सुमारे एक हजार युद्धकैद्यांची दोन्ही बाजूंनी सुटका केली आहे.





