Pratap Sarnaik : हेडफोन घालून वाहन चालवणे आता महागात पडणार; सरकार नवे नियम आणणार

मुंबई : खासगी अथवा प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, टॅक्सीचे चालक हेडफोन घालून गाडी चालवत मोबाइलवर क्रिकेट मॅच अथवा चित्रपट पाहणे आता महागात पडणार आहे. या प्रकारांना प्रभावीरीत्या पायबंद घालण्यासाठी लवकरच परिवहन विभागाकडून नवी नियमावली आणून अशा चालकांवर निर्बंध आणले जातील, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
बस चालवत मोबाईलवर क्रिकेट मॅच बघणाऱ्या खासगी चालकाला एसटी प्रशासनाने बडतर्फ करण्यात आल्यानंतर सरनाईक यांनी सरकार अशा प्रकारांबद्दल गंभीर असल्याचे स्पष्ट केले. संबंधित खासगी कंपनीला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मंत्री सरनाईक यांच्या निर्देशानुसार एसटी महामंडळाने ही कारवाई केली.
नेमकं प्रकरण काय?
२१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता दादर येथून स्वारगेट (पुणे) साठी बस जात होती. या बसमधून अनेक प्रवासी प्रवास करत होते. मात्र, बस चालक बस चालवताना बेशिस्तपणे मोबाईलवर क्रिकेटचा सामना पाहत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भातील एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर याची दखल मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आणि कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार एसटीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संबंधित खासगी संस्थेच्या चालकास प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बेशिस्त वाहन चालवल्याप्रकरणी बडतर्फ केले. संबंधित संस्थेला ५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
नवी परिवहन नियमावली आणणार
याबाबत बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, ई-शिवनेरी ही एसटीची मुंबई-पुणे मार्गावरील महत्त्वाची सेवा आहे. या बसमधून अनेक सन्माननीय व्यक्ती प्रवास करीत असतात. मअपघात विरहित सेवाफ असा या सेवेचा नावलौकिक आहे. त्यामुळे बेदरकार वाहन चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
एसटीकडे असलेल्या खासगी बसच्या चालकांना संबंधित संस्थेकडून वेळोवेळी शिस्तबद्ध वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाण्याची गरज आहे. तसेच बेशिस्त कोणत्याही स्थितीत सहन केली जाणार नाही. मोबाईलवर मॅच पाहत वाहन हाकणे हा भयावह प्रकार आहे. त्यामुळे लवकरच आम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन असे प्रकार रोखण्यासाठी नवी परिवहन नियमावली आणणार आहोत.
तीन वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी ठाण मांडणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करा
सरकारी सेवेत अधिकाऱ्यांची दर तीन वर्षांनी बदली ही नेहमीची प्रक्रिया असते. यामागे स्थानिक नेते किंवा प्रशासकीय यंत्रणेतील हितसंबंध टाळून पारदर्शकता राखण्याचा हेतू असतो. मात्र, काही अधिकारी राजकीय नेत्यांची मर्जी आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळवून वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी बसून राहतात.
अशा अधिकाऱ्यांचे हितसंबंध वाढतात आणि सामान्य कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो. ही बाब राज्य परिवहन (एसटी) महामंडळालाही लागू आहे. याच पार्श्वभूमीवर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळात तीन वर्षांहून अधिक काळ एकाच मुख्यालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत.





