पुणे जिल्हा | पूर्व हवेलीत सिग्नलकडे चालकांचे दुर्लक्ष

सोरतापवाडी, (वार्ताहर)- पुणे सोलापूर महामार्गावर हडपसरपासून उरळी कांचनपर्यंत अनेक ठिकाणी सिग्नल असून चालकांचे पूर्णपणे या सिग्नलकडे दुर्लक्ष झाले आहे. हडपसर येथे गाडीतळ चौक, रविदर्शन चौक, पंधरा नंबर चौक, शेवाळेवाडी येथील भारत पेट्रोल पंपाशेजारील चौक, शेवाळेवाडी फाटा, द्राक्ष बागेच्या सुरुवातीचा चौक, लोणी स्टेशन चौक, राजबाग कॉर्नचौक, थेऊरफाटा चौक, उरुळी कांचन येथील चौक अशा ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित आहे.
पण बहुतेक वेळा वाहनचालक लाल सिग्नलकडे दुर्लक्ष करून वाहने पुढे नेताना दिसत आहे. बेशिस्त वाहन चालकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पोलीस असतील तरच वाहने सिग्नलवर उभी केली जातात आहेत. पोलीस नसले की अनेक ठिकाणी सिग्नलचे सर्व नियम धाब्यावर बसविले जात असून त्यामुळे वाहतूक कोंडीत भरच पडत आहे. सिग्नल यंत्रणेला हरताळ फासल्यामुळे अपघात होवू लागले आहेत.
वाहतुकीला शिस्त लागावी, वाहतूक कोंडी व अपघात होऊ नये यासाठी वरील ठिकाणी सिग्नल बसविले आहेत. वाहनचालक सिग्नलचे नियम बिनधास्तपणे मोडीत काढत आहेत. वाहतूक शाखेच्या उदासीनतेमुळे या सिग्नल यंत्रणा केवळ शोभेची वस्तू ठरत आहेत. वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून वाहतूक शाखेसह, महापालिका, पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
मागील आठवड्यात एका महिलेचा शेवाळेवाडी येथील पेट्रोल पंपासमोर अपघात होऊन जीव गमवावा लागला. याला जबाबदार सिग्नल यंत्रणा असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. वरील ठिकाणी सिग्नलवर वाहनधारकांच्या सुविधेसाठी टाइमर बसविण्यात आले असून. या टाइमरद्वारे वाहनचालकांना सिग्नल किती वेळात रेड वा ग्रीन होणार हे दिसत असते. मात्र, अनेकदा बेशिस्त वाहनचालक या टाइमरकडे दुर्लक्ष करून सर्रास नियम पायदळी तुडवत आहेत.
सीसीटीव्ही यंत्रणा बंद
सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्यामुळे अनेक वाहन चालक बिनधास्त सिग्नल तोडत आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही यंत्रणा ताबडतोब चालू करुन सिग्नल तोडणार्यांवर दंड आकारण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील वर्षी सिग्नल तोडल्याची कारवाई सीसीटीव्हीद्वारे केली जात होती. परंतु सिग्नल यंत्रणेचे सीसीटीव्ही खराब झाले आहेत.
त्यामुळे चालक बिनधास्तपणे आपली गाडी पुढे नेत आहेत. याला जबाबदार वाहतूक पोलीसही आहेत. पोलीस सिग्नलवर न थांबता सिग्नलच्या पुढे थांबतात. सिग्नल तोडल्यानंतर कारवाई केली जाते. परंतु पोलीस जर सिग्नलवर थांबले तर वाहन चालक सिग्नल तोडणार नाहीत. सीसीटीव्ही कँमेरे जर चालू केले आणि सिग्नल तोडणार्यांवर दंड वसुली केली तर शिस्त लागू शकते.





