लोणावळा, (वार्ताहर) – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील नवीन बोगद्यात दोन कंटेनर आणि एक गॅस टँकर यांची धडक होऊन विचित्र अपघात झाला. त्यात गॅस टँकर चालक अक्षय वेंकटराव ढेले (वय ३०, रा. अहमदपूर-कुमठा, जि. लातूर) हा जागीत मृत पावला तर कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. अपघातानंतर गॅस टँकर मधील गॅस गळतीची शंका निर्माण झाली होती. मात्र केमिकल एक्सपर्ट तातडीने घटनास्थळी आले आणि परिक्षण केले. यावेळी टँकर रिकामा असल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही. अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग आणि पोलीस यंत्रणा जागेवर आल्या आणि अपघातग्रस्त वाहने बाहेर काढली व वाहतूक सुरळीत केली. अपघातातील मृताचे शव खोपोलीतील सरकारी रूग्णालयात नेण्यात आले. आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल यांनी घटनास्थळी मदतकार्य केले. खोपोली पोलीस स्टेशन हद्दीत हा अपघात घडला आहे.