Satara Crime News : मारहाणीत वाहन चालकाचा मृत्यू; बनपुरीजवळील घटना

वडूज : दुचाकी वाहनाला झालेल्या अपघाताच्या व नुकसान भरपाई देण्याच्या कारणावरून चारचाकी वाहन चालका संजय पांडुरंग कर्चे (वय ,५५ रा. पिंपरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याला झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना बनपुरी (ता. खटाव) येथे घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सोनाली संजय कर्चे यांनी पोलीसांत दिलेल्या फिर्यादीतील माहितीनुसार, मृत कर्चे यांचे चारचाकी वाहन क्रमांक (एमएच ४५ एएफ ३५७१) असून ते स्वत: वाहन चालवून ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात. रविवारी (ता.१५) कर्चे चारचाकी वाहनात कांदे भरून नातेपुते ते सांगली प्रवास करीत होते. त्यावेळी सोनाली हिने कर्चे यांना फोन केला असता त्यांनी उचलला नाही.
नंतर एका अनोळखी व्यक्तीने फोन घेऊन तुमच्या वडीलांनी बनपुरी येथे दोन दुचाकीस्वारांना धडक दिली असून दुचाकीस्वारांचा पाय मोडला आहे, त्यांना सातारा येथे दाखल केले आहे. आम्ही तुमच्या वडीलांना मारहाण केली नाही तसेच तुम्ही अपघातग्रस्त वाहनांचे व जखमींच्या औषधोपचाराचे पैसे दिल्यास आम्ही पोलीसांत तक्रार करणार नसल्याचे सांगितले. याबाबत सोनाली हिने बहिण वर्षा दत्तात्रय सोडमिसे हिला झालेली घटना सांगितली.
त्यानंतर मामा रावसाहेब रामचंद्र खांडेकर (रा. लोणार खडकी, ता. माण) यांना सांगून त्यांना कातरखटाव येथे जाण्यास सांगितले. त्यावेळी रात्री साडेदहा वाजता श्री. खांडेकर, बजीरंग काळेल, शिवाजी क्षीरसागर कातरखटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्यानंतर संजय कर्चे यांच्यावर उपचार सुरू होते.
सोनाली हिने वडीलांना फोनवरून अपघात कसा झाला याबाबत माहिती घेतली असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्चे कातरखटाव ते मायणी रस्त्याने जात असताना बनपुरी गावच्या हद्दीत रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांचे चारचाकी वाहन अन्य दुचाकी वाहनाला घासून किरकोळ अपघात झाला होता. त्यावेळी दुचाकीवरील अज्ञात व्यक्तींनी कर्चे यांचा पाठलाग करून त्यांना थांबवून अन्य लोकांना बोलावून त्यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच रॉडने मारहाण केली.
तसेच त्यांच्याकडील दहा ते पंधरा हजार रूपये काढून घेतले. त्यांना झालेल्या बेदम मारहाणीत पाय, बरगडी मोडल्याचे व तोंडातून रक्त येत असल्याचे दिसून आले. तसेच त्यांच्या अंगावर, पाठीवर, छातीवर, गुप्तांगावर बेदम मारहाण झाल्याचे व्रण दिसून आल्याचे खांडेकर यांनी सांगितले.
त्यानंतर संजय कर्चे यांना घेऊन खांडेकर खडकी येथे गेले. सोमवारी (ता. १६) सकाळी त्रास होऊ लागल्याने कर्चे यांना म्हसवड येथील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी नेले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी म्हसवड येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले असता संजय कर्चे मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे तपास करीत आहेत.





