Drishyam 3 Box Office : दृश्यम ३ चा बॅाक्स अॅाफिसवर जलवा! आठवड्याभरात केली बक्कळ कमाई
Drishyam 3 Box Office : या चित्रपटात मोहनलाल यांनी पुन्हा एकदा जॉर्जकुट्टीची भूमिका साकारली असून त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक होत आहे.

Drishyam 3 Box Office : दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांचा बहुप्रतिक्षित सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट ‘दृश्यम ३’ सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. ‘दृश्यम’ मालिकेच्या पहिल्या दोन भागांना मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर तिसऱ्या भागाकडूनही प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा होत्या आणि हा चित्रपट त्या अपेक्षांवर खरा उतरल्याचे दिसून येत आहे.
दिग्दर्शक जीतू जोसेफ यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला ‘दृश्यम ३’ चित्रपटगृहात २१ मे रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून चित्रपटाने कमाईचा वेग कायम ठेवला असून प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनही त्याला भरभरून दाद मिळत आहे.
चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल 15.85 कोटी रुपयांची कमाई केली होती. आठवड्याच्या मध्यात कमाईत किंचित घट झाली असली, तरी वीकेंडला चित्रपटाने पुन्हा जोरदार मुसंडी मारली. आतापर्यंत ‘दृश्यम ३’ने 91.30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
हेही वाचा : Twinkle Khanna : ट्विंकल खन्नाचा ५२ व्या वर्षी ग्लॅमरस अंदाज; पती अक्षय कुमारसोबतचा Video व्हायरल
या चित्रपटासमोर अक्षय कुमारचा ‘भूत बंगला’, रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’, सूर्या अभिनित ‘करुप्पू’ तसेच आयुष्मान खुराना आणि सारा अली खानचा ‘पति, पत्नी और वो 2’ यांसारख्या चित्रपटांचे आव्हान होते. याशिवाय लक्ष्य लालवानी आणि अनन्या पांडे यांचा ‘चांद मेरा दिल’ हाही त्याच काळात प्रदर्शित झाला. मात्र, या सर्व स्पर्धेला तोंड देत ‘दृश्यम ३’ने आपला दबदबा कायम ठेवला आहे.
या चित्रपटात मोहनलाल यांनी पुन्हा एकदा जॉर्जकुट्टीची भूमिका साकारली असून त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक होत आहे. त्यांच्यासोबत मीना (राणी), अंसिबा हसन (अंजू), एस्थर अनिल (अनुमोल), सिद्दीक (प्रभाकर) आणि आशा शरथ (गीता प्रभाकर) यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
‘आशीर्वाद सिनेमाज’च्या बॅनरखाली अँटोनी पेरुम्बावूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. उत्कंठावर्धक कथा, दमदार अभिनय आणि प्रभावी दिग्दर्शनाच्या जोरावर ‘दृश्यम ३’ यंदाच्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे.





