UEFA Euro Cup 2021 | खेळाडूंच्या कृतीने व्यवसायावर पाणी

रोम – जागतिक फुटबॉलपटूंनी पत्रकार परिषदेत कोकाकोला आणि मद्याच्या बाटल्या हटवल्यामुळे नव्याच प्रश्नाला वाचा फुटली आहे. यापुढे खेळाडूंसमोर या बाटल्या ठेवायच्या की नाही असा प्रश्न कंपन्यांसमोर निर्माण झाला असून खेळाडूंच्या या कृतीमुळे त्यांच्या व्यवसायावरच पाणी पडले आहे.
सध्या सुरु असलेल्या यूरो करंडक फुटबॉल स्पर्धेत एका सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रोनाल्डोने त्याच्या समोर ठेवलेल्या कोकाकोलाच्या बाटल्या हटवून पाण्याची बाटली उपस्थितांना दाखवली व पाणी प्या असाच संदेश दिला.
त्याचाच कित्ता गिरवताना फ्रान्सचा मिडफिल्डर पॉल पोगबाने देखील त्याच्या समोर ठेवलेली मद्याची बाटली हटवली. तसेच इटलीचा अव्वल खेळाडू मॅन्युएल लोकोटेलीने देखील हीच कृती केली. या स्पर्धेचे अधिकृत प्रायोजक असलेल्या या कंपन्यांसमोर आता नवा प्रश्न उभा राहिला आहे.
प्रचंड पैसा खर्च करुन या स्पर्धेला प्रायोजकत्व दिल्यामुळे त्यांना खेळाडूंकडून सहकार्याची अपेक्षा होती. मात्र, खेळाडूंनी केलेल्या कृतीमुळे या कंपन्यांचा भ्रमनिरास झाला असून त्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. मात्र, जागतिक क्रीडाविश्वातून या खेळाडूंना प्रचंड पाठिंबा मिळत आहे.
रोनाल्डोच्या कृतीमुळे कोकाकोला कंपनीला करोडो रुपयांचा तोटा सहन करावा लागला असून तीच अवस्था एका मद्य निर्मिती करत असलेल्या कंपनीबाबतही निर्माण झाली आहे. आपण जी कृती करतो त्यातून चाहते प्रेरणा घेतात, त्यामुळे चुकीच्या गोष्टींचे समर्थन करण्यामुळे अत्यंत चुकीचा संदेश जातो, असे मत रोनाल्डोसह अन्य खेळाडूंनीही व्यक्त करत आपल्या भूमीकेचे समर्थनही केले आहे.
तोटा कसा भरून निघणार…
या कंपन्यांना जे नुकसान झाले आहे ते कसे भरून काढायचे असाही प्रश्न निर्माण झाला आहे. युरो स्पर्धेला प्रचंड रकमेचे प्रायोजकत्व दिल्यानंतरही जर खेळाडूंकडून अशी कृती होत असेल तर जागतिक फुटबॉल महासंघ या नुकसानीची भरपाई देणार का, असा सवाल कोकाकोला कंपनीने उपस्थित केला आहे. त्यामुळे येत्या काळात महासंघाकडून खेळाडूंवर दडपण आणले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





