पुणे | “ससून’च्या पाच वर्षांच्या कामकाजाची श्वेतपत्रिका काढा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “ललित पाटील प्रकरणापासून ससून रुग्णालयातील गैरकारभार सातत्याने समोर येत आहे. आता पुणे अपघात प्रकरणातही अल्पवयीन चालकाच्या रक्ताची चाचणी करताना ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी फेरफार केल्याचा आरोप केला जात आहे.
या प्रकरणी सातत्याने ससूनच्या व्यवस्थापनावर आरोप केले जात आहेत. त्यामुळे ससून रुग्णालय प्रशासनाच्या गेल्या पाच वर्षांच्या कामकाजाची श्वेतपत्रिका काढा,’ अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
खासदार सुळे म्हणाल्या, “गेल्या काही महिन्यांपासून ससून रुग्णालयाबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. काही महिन्यांपूर्वी ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणी हे रुग्णालय चर्चेच्या केंद्रस्थानी आले. तर आता कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलल्याने पुन्हा चर्चेत आले आहे. याप्रकरणी ससूनच्या दोन वरिष्ठ डॉक्टरांना अटक केल्याने ससूनची प्रतिमा आणखीनच डागाळली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. ससूनमधील काही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी गैरकृत्य केले आहे. परंतु, आता सर्वच डॉक्टर, कर्मचाऱ्यांकडे संशयाने पाहिले जात आहे.
तसेच रुग्णसेवेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असणारे ससून रुग्णालय संशयाच्या भोवऱ्यात अडकत चालले आहे. रुग्णालय प्रशासनाच्या एकंदर कामकाजाची त्यामुळे समिक्षा होणे आवश्यक आहे,’ मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.




