शिरूर : शिरूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीची तयारी जोरात सुरू असून, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे. या रचनेवर नागरिकांना १८ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले की, प्रारूप प्रभाग रचना नगरपरिषद कार्यालयातील सूचना फलकावर आणि अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना लेखी स्वरूपात आवक-जावक विभागात सादर कराव्यात. हरकती दाखल करणाऱ्यांना स्वतंत्र सुनावणीसाठी वेळ देऊन त्यांचे म्हणणे ऐकले जाईल. मात्र, ३१ ऑगस्टनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही. यंदा नगरपरिषदेच्या जागांमध्ये ३ जागांची वाढ झाली असून, मागील २१ ऐवजी आता २४ नगरसेवक निवडले जाणार आहेत. यासाठी १२ प्रभाग निश्चित करण्यात आले असून, प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडले जाणार आहेत. प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर याच प्रभागांवर आधारित आरक्षणाची सोडत काढली जाईल. यात सर्वसाधारण, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती आणि महिलांसाठीचे आरक्षण निश्चित होईल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी नगरपरिषद परिसरात जोरदार चळवळ सुरू केली आहे. कोणत्या प्रभागाला कोणते आरक्षण मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रभाग रचनेचा नकाशा आणि माहितीपत्रक नागरिकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचा अभ्यास करून त्रुटी किंवा दोष आढळल्यास ३१ ऑगस्टपूर्वी लेखी हरकती सादर कराव्यात, असे आवाहन मुख्याधिकारी पाटील यांनी केले आहे.