मावळ: वडगाव नगरपंचायतीने दाखल झालेल्या हरकती आणि सूचनांनुसार संभाव्य बदल करून तयार केलेला वडगाव शहराचा प्रारूप विकास आराखडा नागरिकांच्या अवलोकनासाठी प्रसिद्ध केला असल्याची माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रवीण निकम यांनी दिली आहे. वडगाव नगरपंचायतीची स्थापना ३ फेब्रुवारी २०१८ रोजी झाली असून शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून शहराचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने २१ जानेवारी २०२१ रोजी सर्वसाधारण सभेच्या ठराव अन्वये शहराचा विकास आराखडा तयार करण्याचा इरादा राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला होता. त्याअनुषंगाने शहराचा प्रारूप विकास आराखडा फेब्रुवारी २०२४ मध्ये तयार करण्यात आला. त्या आराखड्यात शहरातील नागरिकांना हरकती/सूचना मागवण्यासंदर्भात सुचित करण्यात आले होते. सदरच्या हरकती सूचनांची सुनावणी घेण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली होती. सदर समितीने नागरिकांच्या प्राप्त सर्व हरकती/सूचनांवरती सुनावणी घेऊन आपला अहवाल नगरपंचायत कार्यालयास कळविला आहे. त्या अहवालाच्या अनुषंगाने प्रारूप विकास आराखड्यामध्ये संभाव्य बदल करून सदरचा प्रारूप विकास आराखडा नागरिकांच्या अवलोकनासाठी नगरपंचायत कार्यालयामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सदरच्या विकास आराखड्यामध्ये एकूण ४३ बदल करण्यात आलेले असून आराखडा हा अंतिम मंजुरीस्तव शासनाकडे महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ अन्वये सादर करण्यात येणार आहे, असे डॉ. निकम यांनी सांगितले.