बोपदेव घाट लैंगिक अत्याचार प्रकरणी या तारेखेला दोषोरोप निश्चितीचा मसुदा सादर होणार

Bopdev Ghat Rape Case | बोपदेव घाटात ३ अॅाक्टोबर २०२४ रोजी एका २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. या घटनेनंतर पुणे शहरासह राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. तर एक आरोपी अद्यापही फरारच आहे. या प्रकरणातील दोन आरोपींविरोधात येत्या ८ एप्रिल रोजी विशेष सरकारी वकील उज्वला पवार यांच्याकडून दोषारोप निश्चितीचा मसुदा न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.
बोपदेव घाटातील लैंगिक अत्याचार प्रकरणी शोएब अख्तर ऊर्फ शोएब बाबू शेख (वय २७)व चंद्रकुमार रवीप्रसाद कनोजिया (वय 20) हे आरोपी अटकेत आहेत. तर या लैंगिक अत्याचार प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. वानवडी येथील लष्कर न्यायालयात आरोपींविरोधात पाचशे पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.
येरवडा कारागृहात घेण्यात आलेल्या चाचणी ओळख परेडवेळी आरोपींची ओळख स्पष्ट झाल्यानंतरच पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. या लैंगिक अत्याचार प्रकरणातील शोएब अख्तर ऊर्फ शोएब बाबू शेख व चंद्रकुमार रवीप्रसाद कनोजिया या आरोपींनी घटनेच्या दिवशी पीडिता व घटनेच्या दिवशी जखमी झालेल्या तिच्या मित्राने ओळखले.
या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर सुरु करावी असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वला पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.





