पुणे | डॉ. तावरेच्या संपर्कासाठी कोणाची मध्यस्थी?

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या विशाल आणि शिवानी अग्रवाल यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्या वेळी दोघांना ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दोघांनी मध्यस्थीने डॉ. अजय तावरे याच्याशी संपर्क साधला. त्याला भेटून रक्त नमुना बदलण्याबाबत आरोपी डॉ. श्रीहरी हाळनोर याला कोणी मार्गदर्शन केले, यासह विविध मुद्द्यांचा पोलीस तपास करत आहेत.
रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (वय ५०) आणि आई शिवानी विशाल अग्रवाल (वय ४९, दोघेही रा. बंगलो क्र. १, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) दोघांना शनिवारी (दि. १) अटक करण्यात आली आहे.
शिवानीने मुलाच्या ऐवजी स्वतःचे रक्त तपासणीसाठी दिल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. विशाल अग्रवाल याच्या सांगण्यावरून ससूनच्या आपत्कालीन विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर याने शिवानीचे रक्त घेतल्याचे समोर आले आहे.
त्यानुसार विशाल यास शनिवारी संध्याकाळी ससूनमधील डॉक्टरांवर दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. डॉक्टरांवर दाखल असलेल्या गुन्ह्यात विशालला अटक करण्याची परवानगी मिळण्याबाबतचा अर्ज पोलिसांनी शुक्रवारी दाखल केला होता.
दरम्यान, अग्रवाल पती-पत्नीच्या रक्ताचा नमुना घेऊन डीएनए तपासणीसाठी पाठवायचा आहे. विशाल अग्रवाल याने ससूनमधील कर्मचारी अतुल घटकांबळे याला दोन संशयित व्यक्तींच्या मदतीने तीन लाख रुपये डॉ. हाळनोर यास दिले आहेत. त्या व्यक्तींची माहिती घ्यायची आहे.
पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने डॉ. हाळनोर याने अल्पवयीन मुलगा आणि इतरांचे रक्त घेताना वापरलेली सिरिंज आणि मूळ रक्ताचा नमूना अग्रवाल पती- पत्नीकडे दिला काय, याचा तपास करायचा आहे, तसेच गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी गुन्ह्यातील सर्व आरोपींकडे एकत्रित तपास करायचा असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली. आरोपींच्या वतीने ॲड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली.
आणखी आरोपी निष्पन्न
रक्ताचा नमुना घेतला त्या दिवशीचे ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहेत. त्या फुटेजची पाहणी केली असता, त्यातून महत्त्वाचे धागेदोरे प्राप्त झाले असून, आणखी काही आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला आहे, अशी माहिती या गुन्ह्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयास दिली.
मुलगा सुधारगृहात : आई- वडील व आजोबा अटकेत
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलगा सध्या बालसुधारगृहात आहे. त्याला पाच जूनपर्यंत सुधारगृहात ठेवण्याचा आदेश बाल न्याय मंडळाने दिला आहे,
तर या गुन्ह्यात मुलाचे वडील, आई आणि आजोबा अटकेत आहेत. अपघातानंतर चालकाच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विशाल अग्रवाल आणि मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना अटक झाली होती. त्या गुन्ह्यात दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.





