पुणे | रक्त बदलण्याचा “प्लॅन’ डाॅ. तावरेचाच!

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुण्यातील हायप्रोफाइल अपघातप्रकरणात अल्पवयीन आरोपीचे रक्त बदलण्याचा “प्लॅन’ डॉ. अजय तावरे यानेच रचल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याने विशाल अग्रवाल याला “मुलाच्या रक्ताचा नमुना बदलल्यास त्यात मद्याचा अंश आढळणार नाही.
तसेच केसमध्ये चांगला फायदा होईल,’ असे “पटवले’ होते. दरम्यान, डॉ. तावरे याच्याशी आणखी कोणी संपर्क साधला होता का? याचीही तपासणी केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, तावरे याचा किडनी रॅकेट प्रकरणातील सहभागही पुन्हा तपासला जात आहे.
कल्याणीनगर भागातील अपघात प्रकरणात पोलिसांकडून ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे आणि प्रथमोपचार विभागाचा डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेकडून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. विशाल अग्रवाल याने डेड हाऊसचा शिपाई अतुल घटकांबळे याच्याद्वारे डॉ. तावरे याच्याशी संपर्क साधला. तसेच याबाबत मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर डॉ. तावरेनेच विशाल अग्रवाल यांना रक्त बदलण्याची कल्पना सांगितली. त्यांनी डॉ. हळनोर याला त्या अल्पवयीन आरोपीचे रक्त घेण्यास सांगितले.
मात्र, ते तपासणीसाठी न देता कचरा पेटीत टाकायला लावले. तर, डॉ. हरनोळ याने तपासणीसाठी दुसऱ्याच व्यक्तीचे रक्त घेऊन ते अल्पवयीन मुलाच्या नावाने दिले. तत्पूर्वी डॉ. तावरेने विशाल याच्याशी सर्व बोलणे झाल्यानंतर लागलीच डॉ. श्रीहरी हाळनोर याला रक्त बदल व चाचणीची पुढची प्रक्रिया पार पडली. तसेच त्याबदल्यात शिपाई अतुल याच्यामार्फत ३ लाख रुपये पाठवले, असे तपासात पुढे आले आहे.
चहा-नाष्ट्यावरही मॅनेज व्हायचा डॉ. तावरे
पोलिसांनी प्राथमिक तपासात डॉ. तारवे याची “कुंडली’च बाहेर काढली आहे. तो पैशांसाठी पोलिसांनाही सोडत नव्हता. पैसे न दिल्यास अनेक रिपोर्ट तो पेडिंग ठेवायचा, अशा अनेक तक्रारी पोलीस कर्मचाऱ्यांकडून पुढे आल्या आहेत. तो क्लास-वन अधिकारी असला, तरी थर्ड क्लास व्यक्तीसारखा वागत होता.
तो नागरिकांकडून २००-५०० रुपयेही उकळत होता. इतकेच नव्हे, तर अनेकदा त्याने कामाच्या बदल्यात कॅण्टीनमध्ये चहा आणि नाष्टयाची बिलेही नागरिकांना भरायला लावल्याचे पुढे आले आहे. अग्रवाल यांच्या केसमध्ये मात्र त्याने खूप मोठा “हात मारला’ असे दिसत आहे. त्यांचे झालेले “डील’ आणि लिंक तपासली जाणार आहे, असे या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
डॉ. तावरेची मस्ती जिरली अन् हवाही निघाली
सोमवारी अटक झाल्यावर डॉ. तावरे हा “कोणालाच सोडणार नाही, एकेकाची नावे घेणार’ असा बोलत होता. यामुळे आपणास काही होणार नाही, असे त्याला वाटत होते. मात्र, आपण पुरते अडकलो असून आपल्या मदतीला कोणीच मोठा व्यक्ती होणार नाही, हे मंगळवारी दिवसभरात त्याला कळून चुकले.
यामुळे त्याची मस्ती जिरलीच; तसेच आपण कोणीतरी मोठे असल्याची हवाही निघाल्याचे पोलिसांनी सांगितले. तो ससून रुग्णालयात एकप्रकारे खुला दरोडाच टाकत होता. काहीही करा, आपल्याला कोणाची भीती नाही असा त्याचा अविर्भाव होता. आता मात्र तो विचारात पडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
अल्पवयीन आरोपीचे रक्त बदल प्रकरणात ससून रुग्णालयातील दोघाही डॉक्टरांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई व्हावी. तसेच नियमानुसार दोघांचे निलंबन करावे, असा प्रस्ताव संबंधित खात्याला पाठवाला जाणार आहे – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे




