Dr.Tara Bhavalkar : हिंदीच काय पहिलीपासून इंग्रजीही नको; डॉ.तारा भवाळकर यांनी मांडली कणखर भूमिका

मुंबई : हिंदीच काय पहिलापासून इंग्रजीही नको. विद्यार्थ्यांना चौथीपर्यंत फक्त मातृभाषेतच शिक्षण द्या. जगाच्या पाठीवर कुठेही इतक्या भाषा इतक्या लहान वयात शिकवल्या जात नाहीत. मुलांना पाचवीपासून दुसरी भाषा आणि आठवीपासून तिसरी भाषा शिकवा. हे संपूर्ण शिक्षण क्षेत्राच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे, अशी कणखर भूमिका साहित्य संमेलनाध्यक्ष आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.
यापूर्वी, मुख्यमंत्री कोणत्या भाषेत शिकलेत? एका पक्षाने निर्णय घेतला म्हणून हिंदीची सक्ती करू नका, अभिनेते सयाजी शिंदेंनी सरकारला सुनावले आहे. यासह, सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनीही हिंदी सक्तीला विरोध केला. ‘सक्तीची भक्ती काही कामाची नसते. त्याने उलट देवाची बदनामी होते. आपण कितीतरी हिंदी लेखकांचे फॅन आहोत. पण ते आपलं प्रेम आहे. ती सक्ती नाही,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
भवाळकर पुढे म्हणाल्या, ‘मी स्वतः गेले 45 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम केले आहे. स्वतः जागरुक नागरिक आणि शिक्षिका आहे. सर्व भाषाविषय सर्व स्तरावर शिकवले आहेत. मी स्वतः अनुभवाने सांगते, इयत्ता चौथीपर्यंत विद्यार्थ्यांना मातृभाषेव्यतिरिक्त कोणतीही भाषा शिकवली जाऊ नये. विद्यार्थ्यांचा मातृभाषेत पाया पक्का होऊ द्यावा.’
जुनी पद्धत रास्त
विरोध कुठल्याही भाषेला नसून, ती भाषा पहिलीपासून लादण्याला आहे. एक शिक्षक म्हणून विरोध आहे. एक नागरिक म्हणून विरोध आहे. त्यामुळे पहिलीपासून जे इंग्रजी शिकवलं जातं ते ही योग्य नाही. आणि तिसरी भाषा तर त्याच्यावर आणखी अन्यायकारक होऊ शकेल. जगाच्या पाठीवर कुठेही इतक्या भाषा इतक्या लहान वयात शिकवल्या जात नाहीत. त्यानंतरच्या काळामध्ये पाचवीपासून दुसरी भाषा आणि आठवीपासून तिसरी भाषा ही मुलाला शिकवली जावी. ती पद्धत आजपर्यंत होती आणि ती रास्त होती, असेही भवाळकर म्हणाल्या.





