सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारासाठी डॉ. गोऱ्हे मैदानात

पुणे – शिवाजीनगर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी पदयात्रांचे आयोजन केले. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि खासदार संजय काकडे प्रचारात सहभागी झाले.
भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांची पहिली प्रचार यात्रा ज्ञानेश्वर पादुका चौक, वडारवाडी, पांडवनगर, दीप बंगला चौक या ठिकाणाहून झाली. यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, आनंद मंजाळकर, ज्योत्स्ना एकबोटे, स्वाती लोखंडे, सागर धोत्रे, नीता मंजाळकर, अपर्णा कुऱ्हाडे, दत्ता घोगलू, राजेश धोत्रे, राम म्हेत्रे, किरण ओरसे उपस्थित होते. सिद्धार्थ शिरोळे यांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन गोऱ्हे यांनी यावेळी केले.
त्यानंतर खासदार संजय काकडे यांच्या नेतृत्त्वाखाली जय जवाननगर नाईक वस्ती येथे बंजारा समाजाच्या तरुणांचा मेळावा देखील घेण्यात आला. या वेळी सिद्धार्थ शिरोळे यांनी तरुणांना मार्गदर्शन केले.
दरम्यान, शिरोळे यांनी सकाळी खडकी आणि संगमवाडी येथील दोन गुरुद्वारांना भेट देत आशीर्वाद घेतले. त्यानंतर फर्गसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली येथे मतदारांशी संवाद साधला. यावेळी शिवाजी चव्हाण, जितू मंडोरा, प्रवीण शेळके, दत्ता खंडाळे उपस्थित होते. जनवाडी-पाचपांडव भागातील कोकणी रहिवासी नागरिकांनी शिरोळे यांना पाठिंबा जाहीर केला.





