Dr Sampada Munde Suicide : गुडलक चौकात महिलांचा एल्गार ; रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी

प्रभात वृत्तसेवा
पुणे – गुडलक चौकात कलाकार कट्टा येथे डॉ संपदा मुंडे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत बिटिया फाउंडेशन, गुलाबो गँग आणि झाशीची राणी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
डॉ. मुंडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करून त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे काम चाकणकर यांनी केले आहे, असा आरोप या वेळी करण्यात आला. या आंदोलनात काँग्रेसच्या संगीता तिवारी, झाशीची राणी प्रतिष्ठानच्या रूपाली पाटील, शिवसेनेच्या स्वाती ढमाले, मनीषा कावेडिया, सोनिया ओव्हाळ, संगीता भालेराव, डिंपल इंगळे, वंदना साळवे, निसु कोटा, पूनम गुंजाळ, नीलम फाये सहभागी झाल्या.
या वेळी चाकणकर यांच्या फोटोला लिपस्टिक लावून,आणि चिल्लरची माळ घालून जोडे मारण्यात आले. नंतर हा फोटो जाळण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.





