पुणे | डाॅ. आंबेडकर वसतिगृहाची दुरुस्ती करा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – घोले रस्त्यावरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे तात्पुरते स्थलांतर करून, वसतिगृहाच्या इमारतीची दुरुस्ती व देखभाल तातडीने करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.
यासदंर्भात मनविसेच्या शिष्टमंडळास दोन दिवसांपासून आयुक्तांची भेट मिळत नव्हती. अखेर मंगळवारी आयुक्तांच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी प्रवेश करून ठिय्या मांडला.
या वेळी मनविसेचे राज्य संघटक प्रशांत कनोजिया, मनसेचे सरचिटणीस ॲड. किशोर शिंदे, पुणे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष नरेंद्र तांबोळी, विनायक कोतकर, धनंजय दळवी, केतन डोंगरे, संतोष वरे, सुबोध घोडके आदी उपस्थित होते.
डॉ. आंबेडकर वसतिगृहांच्या भिंती ओलसर झाल्या आहेत, पाठीमागे कचरा डंपिंग व बायोगॅस प्रकल्प आहे, पावसामुळे दूषित पाणी, अस्वच्छता आणि मच्छरांचा प्रादूर्भाव वाढला आहे.
त्यामुळे वसतिगृहात राहणारे विद्यार्थी आजारी पडत आहेत. सौरऊर्जा बंद आहे, इमारतीचे विद्युतीकरण धोकादायक आहे, तसेच लिफ्टही बंद अवस्थेत असून, तातडीने कार्यान्वित करावी, अशी मागणी मनविसेने केली आहे.
चौकशी व्हावी : आमदार शिरोळे
डॉ. आंबेडकर मुलांच्या वसतिगृहातील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूसंदर्भात अहवाल सादर करावा आणि घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली. विद्यार्थ्यांना आवश्यक सोयीसुविधा पुरवाव्यात, अशा सूचनाही उपायुक्त नितीन उदास यांना केल्या.
अभाविपचे आंदोलन
महानगरपालिकेच्या आंबेडकर वसतिगृहात चाललेल्या निष्काळजीपणा व अस्वच्छतेमुळे दोन विद्यार्थ्यांचा डेंग्यू व कावीळ या आजारामुळे मृत्यू झाला, असा आरोप करीत प्रशासनाच्या या हलगर्जीपणाविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी वसतिगृहासमोर मंगळवारी तीव्र आंदोलन केले.

