नारायणगाव : जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची सन २०२६-२०२७ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी डॉ. प्रशांत काचळे यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी डॉ. आनंद सराईकर व डॉ. हेमा अडसरे, सचिवपदी डॉ. प्रवीण शिंदे व डॉ. सारिका फुलवडे, तर खजिनदारपदी डॉ. संतोष भोर व डॉ. मयुरी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष डॉ. प्रसाद शिंगोटे यांनी नवनियुक्त अध्यक्ष डॉ. प्रशांत काचळे यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार सुपूर्द केला. यावेळी बोलताना डॉ. प्रशांत काचळे यांनी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद अधिक चांगला होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. कार्य, विचार आणि सेवाभावातून असोसिएशनला नवी दिशा व प्रगती मिळवून देण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी नमूद केले. तंत्रज्ञानातील बदल, रुग्णांच्या वाढत्या अपेक्षा आणि आधुनिक उपचार पद्धती लक्षात घेऊन आरोग्य जनजागृती, विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता तसेच व्यसनमुक्ती अभियान राबविण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पर्यावरण संवर्धनासाठी “एक डॉक्टर – एक वृक्ष” हे अभियान राबवून प्रदूषणविरोधी जनजागृती केली जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. कार्यक्रमास जुन्नर तालुका पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील, डॉ. प्रदीप जोशी, शरद लेंडे, सरपंच डॉ. शुभदा वाव्हळ, उपसरपंच योगेश पाटे, माऊली खंडागळे, मकरंद पाटे, डॉ. राहुल तांबे, डॉ. सदानंद राऊत, डॉ. हनुमंत भोसले, डॉ. संदीप डोळे, डॉ. संदीप काकडे, डॉ. भालचंद्र पोखरकर, डॉ. समीर डेरे, डॉ. प्रतीक गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर डॉक्टर उपस्थित होते. डॉ. प्रदीप जोशी यांनी कार्यकारिणी सदस्यांमध्ये परस्पर आदर आणि सहकार्य वाढविण्याची गरज व्यक्त केली. वैद्यकीय क्षेत्रात केवळ ज्ञान पुरेसे नसून नियमांचे पालन आणि व्यावसायिक मर्यादा जपणेही तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्वर्गीय माजी आमदार वल्लभ बेनके, माजी आमदार अतुल बेनके आणि विद्यमान आमदार शरद सोनवणे यांनी असोसिएशनला वेळोवेळी सहकार्य केल्याचे त्यांनी नमूद केले. उपसरपंच योगेश पाटे यांनी मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी नारायणगाव ग्रामपंचायतीला ५५० झाडे उपलब्ध करून दिल्यास त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत स्वीकारेल, असे स्पष्ट केले. यावेळी शरद लेंडे, माऊली खंडागळे, पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील आणि डॉ. शुभदा वाव्हळ यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. प्रताप रोहोकले यांनी केली. सूत्रसंचालन डॉ. स्मिता डोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. हेमा अडसरे यांनी मानले. जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे कार्य गतिमान होण्यासाठी खालील समित्या नियुक्त ट्रेंड सेटर्स, सोविनियनर कमिटी, कल्चरल कमिटी, ट्रीप कमिटी, स्पोर्ट कमिटी, सीएमई कमिटी, कॅम्प कमिटी, इव्हेंट अँड सेलिब्रेशन कमिटी, फायनान्स कमिटी, ॲडव्हायझरी कमिटी.