डाॅ. प्रदीप कुरूलकरांची न्यायालयीन कोठडीत रवानगी; येरवडा कारागृहात ठेवणार

पुणे – डीआरडीओचे संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना 29 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी दिले. त्यानुसार कुरुलकर यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. येरवड्यात त्यांना कैद्यांच्या बराकीत ठेवले जाणार नाही. कारागृहातील विशेष कक्षात ठेवले जाणार आहे.
कुरुलकर यांच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी (16 मे) संपली. त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पथकाने त्यांना न्यायालयात हजर केली. त्यावेळी सरकार पक्षाकडून गेल्या चौदा दिवसात झालेल्या तपासाचा अहवाल सादर करण्यात आला.
कुरुलकर यांचे वकील ऍड. ऋषीकेश गानू यांनी यापुढे पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याची विनंती न्यायालयाकडे केली. त्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. कारागृहात घरचे जेवण मिळावे, अशी विनंती बचाव पक्षाने केली. ही विनंती न्यायालयाने अमान्य केली. सरकारी पक्षातर्फे ऍड. चंद्रकिरण साळवी यांनी बाजू मांडली.
दरम्यान, पाकिस्तानी एजंटच्या हनीट्रॅपमध्ये कुरुलकर कसे अडकले याची रंजक माहितीच एटीएसने दिली आहे. अनेक प्रकरणांप्रमाणेच, पाकिस्तानी हेरांनी कुरुलकर यांच्याशी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधला. त्यांचा विश्वास संपादन केल्यावर त्यांना खासगी फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याची लालच दाखववून त्यांची फसवणूक केली. हनी ट्रॅपचा भूलभुलैया भल्या-भल्यांना अडकवण्यास कारणीभूत ठरल्याची अनेक उदाहरणे आहेत. असे म्हणतात की बाई, बाटली आणि जुगार माणसाला आयुष्यातून उठवतो. कुरुलकर यांच्या बाबतीतही आमिषाला बळी पडून त्यांचा गेम करण्यात आला असेच म्हणावे लागेल.
कुरुलकर यांनीही त्यांचे वैयक्तिक खासगी फोटो एजंटांना पाठवले. त्यातच कुरुलकर फसत गेले. त्यांच्या खासगी फोटो आणि व्हिडिओचा वापर करून कुरुलकर यांना हळूहळू ब्लॅकमेल करण्यात आले. त्यातूनच त्यांना संवेदनशील संरक्षण माहिती शेअर करण्यास पाकिस्तानी एजंटांनी भाग पाडले. सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या गोष्टींचा वापर ब्लॅकमेल करण्यासाठी होत आहे. कुरुलकर यांनाही याच माध्यमातून ब्लॅकमेल करण्यात आले. त्यामुळे अशा माहिती, फोटो, व्हिडिओ शेअर करताना त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. एवढेच नाही तर ब्लॅकमेल करण्यासाठी त्याचा सहज उपयोग होऊ शकतो हेही यातून स्पष्ट झाले आहे.




