लोणंद -करोनाच्या संकटात प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी म्हणून लोणंदचे डॉ. नितीन उत्तमराव सावंत यांची जिल्हा समन्वय समितीवर निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशानुसार ही निवड झाली असून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी डॉ. सावंत यांचे अभिनंदन केले. जिल्हा प्रशासनाबरोबर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील घटकांशी समन्वय साधण्याची जबाबदारी डॉ. सावंत यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
करोनाच्या संकटात डॉ. नितीन सावंत यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही या उपक्रमांचे कौतुक केले होते. लोणंद येथील सुवर्णगाथा प्रतिष्ठानने नागरिकांच्या मदतीने परप्रांतीयांसाठी अन्नछत्र राबविले होते.
त्याची दखल घेऊन श्रीनिवास पाटील फाऊंडेशनच्यावतीने “करोना हिरो’ म्हणून डॉ. सावंत यांना खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. रामराजे नाईक निंबाळकर, आ. मकरंद पाटील, वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. सावंत यांचे अभिनंदन केले.